Breaking News

मतांचे राजकारणासाठीच मराठा समाजाची दिशाभूल : हेमंत पाटील; मराठा आरक्षणविरोधी याचिकेवर बुधवारी सुनावणी


सातारा (प्रतिनिधी): भाजप सरकारने मराठा समाजाला जे 16 टक्के आरक्षण दिले आहे त्यामध्ये राजकीय आरक्षण दिले नसल्यामुळे ते आरक्षण न्यायालयात टिकू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे त्यामुळेच मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यावर 12 डिसेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे अशी माहिती भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी रविवारी येथी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सध्या भाजप सरकार आरक्षणामध्ये फार मोठा भ्रष्टाचार करत आहे. मराठा, धनगर, मुस्लिम यांच्या मताद्वारे पुन्हा सत्ता आणण्याचे काम करणार आहे. आमची मागणी ही आहे की, मराठा समाजाला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र असे 16 टक्के आरक्षण देण्यात यावे. व आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला स्वतंत्र 7 टक्के आरक्षण द्यावे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले आहे, ते आरक्षण न्यायालयात टिकू शकत नाही. भाजप सरकार केंद्रात सुद्धा सत्तेवर आहे. त्याठिकाणी संसदेमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पास करण्यात यावा व सुप्रिम कोर्टाने 50 टक्के आरक्षणासाठी मर्यादा ठरवून दिली आहे. त्याबाबत केंद्र सरकारने तो आदेश रद्द करण्यासाठी कायदा पास करावा व आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यापेक्षा जास्त करावी. जेणेकरुन मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देता येईल. भाजप सरकार मराठा, धनगर, मुस्लीम समाजाची बोळवण करत आहे. जर भाजपा सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या आत आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास राज्यात व केंद्रात यांची सत्ता राहणार नाही असा विश्वासही हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. मी मराठा आणि धनगर यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढत आहे. परंतु भाजप सरकार सांगते एक आणि करते एक त्यामुळे त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. हे सरकार कायदेशीरपणाने मोर्चे, आंदोलने करण्यांचे आवाज दाबण्याचे काम करत आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता त्यांना इंगा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.