केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची पाहणी


अहमदनगर/खामगाव - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आज पाहणी केली. या पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला. मराठवाडा व विदर्भातही दुष्काळी भागाची पाहणी केली. 
केंद्रीय विभागाचे सहसंचालक सुभाषचन्द्र मीना यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्य पथकाने जिल्ह्यातील नगर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकात पशुधन व दुग्धविकास विभागाचे एल.जी. टेंभुर्ण, विजय ठाकरे यांचा समावेश आहे. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह हेही या पथकासोबत होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनीही पथकाशी चर्चा करून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. शेवगाव तालुक्यातील तळणी शिवारातील विष्णु शंकर सातपुते या शेतकर्‍याच्या शेतात भेट दिली. या वेळी त्यांनी तेथील कपाशी आणि तुरीची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती तसेच त्यामुळे परिस्थितीवर झालेला परिणाम, आगामी पाणीपुरवठा, पशुधन व चार्‍याची व्यवस्था या अनुषंगाने संपूर्ण माहितीचा अहवाल सादर करण्यात आला. 

या पथकाने नंतर पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील शिवारातील पिकांची पाहणी केली. स्थानिक पदाधिकारी, शेतकर्‍यांनी पावसाअभावी पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली. येथील कोरड्या पडलेल्या पाणीपुरवठा तलावाची पथकाने पाहणी केली. यानंतर या पथकाने जामखेड आणि कर्जत तालुक्यातील काही गावांची पाहणी केली.

खामगाव : भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पाहणी पथक खामगावात धडकले. या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल खरेदी प्रक्रियेची पाहणी केली. तसेच काही शेतकर्‍यांशी संवाद साधला. अपुर्‍या पर्जन्यमानामुळे राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्हा देखील दुष्काळाच्या छायेत आहे. दुष्काळगस्त भागाची पाहणी करण्यासाठी नीती आयोगाचे दहा सदस्यीय पथक बुलडाणा जिल्ह्यात आले आहे. या पथकाने काही शेतकर्‍यांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यानंतर नाफेड खरेदी केंद्राला भेट दिली. 

या वेळी केंद्राच्या तीन सदस्यीय पथकासोबत जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, सहायक निबंधक सोळंके, डीएमओ शिंगणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष टाले, दिलीप पाटील, विलास इंगळे, सुलोचना राऊत आदी उपस्थित होते.

शेतमालाच्या भावाबाबत शेतकर्‍यांची नाराजी

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्य धान्याच्या दर निश्‍चितीप्रणालीची माहिती या वेळी केंद्रीय पाहणी पथकाकडून घेण्यात आली. शेतकर्‍यांना हे दर परवडतात का, अशी विचारणाही या वेळी पथकातील एका सदस्याने शेतकर्‍यांना केली. त्या वेळी शेतकर्‍याने शेत मालाच्या भावासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget