Breaking News

रोडरोमिंओंमुळे महाविद्यालयीन विद्यार्थीनी त्रस्तजामखेड ता./प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रोडरोमिओंच्या हिरोगिरीमुळे विशेषत: मुलींच्या शिक्षणावरच गदा येत असल्याचे चित्र दिसून येत असून माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थीनींचे शालाबाह्य होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर गांव व परिसरातील सामाजिक शांततेलाही तडा जात असल्याने या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समित्यांनी जामखेड पोलीस स्टेशनला निवेदनांद्वारे केला आहे.

खर्डा हे चार जिल्हयाच्या सरहद्दीवर मराठवाड्यांसह जामखेड तालुक्यातील अनेक गावांसाठी महत्वाचे व्यापारी व शैक्षणिक केंद्र आहे. याठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे खर्डा इंग्लिश स्कूल व महाविद्यालय, छत्रपती शिक्षण संस्थेचे छत्रपती कनिष्ठ व संत गजानन उच्च महाविद्यालयासह दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. विशेष म्हणजे या सर्व शैक्षणिक संस्था खर्डा गांवापासून विविध दिशेला गांवाबाहेर सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे बाहेरगांवच्या विद्यार्थीनींसह गांवांतील विद्यार्थीनींनाही या रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागतो. बाहेरगावच्या विद्यार्थीनींना तर घर ते संबंधित गांवचा बसथांबा, तेथून एस. टी. बसचा प्रवास, नंतर खर्डा बसस्थानक व पुढे महाविद्यालयापर्यंतचा रस्ता व शेवटी महाविद्यालय अशा सर्व ठिकाणी वेगवेगळ्या टुकार रोडरोमिओंशी सामना होतो. यांची बाहेर तक्रार करायला मुली धजावत नाहीत. आणि घरी तक्रार करावी तर पालक या टुकारांवर कारवाई करण्याऐवजी आपल्या मुलीचा काही दोष नसताना त्यांचे शिक्षण बंद करतात. ही ग्रामीण भागातील वस्तुस्थिती आहे.

 त्यामुळे मुलींना हा त्रास सहन करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. खर्डा बसस्थानक तसेच महाविद्यालयांकडे जाणार्‍या रस्त्यांवर हे रोडरोमिओ कधी टोळक्याने उभे राहून मुलींवर अश्‍लील शेरेबाजी करणे, मोबाईलमध्ये फोटो घेणे मुलींना अडवून बोलण्याचा प्रयत्न करणे, धक्का मारणे, एकटक पाहणे, खुणावणे, दुचाकीवर भरधाव फेर्‍या मारत कर्ण कर्कश हॉर्न वाजवून कट मारण्याचा प्रयत्न करणे, अंगावर गाडी घालण्याचा देखील प्रयत्न करतात.

 यामुळे अपघात होण्याची शक्यता ही वाढते. असले प्रकार खर्डातील व परिसरातील टुकार गँग करतात. या गंभीर विषयावर संरपच संजय गोपाळघरे, ग्रामस्थ बबलु सुरवसे तसेच महाविद्यालयातील प्राचार्य यांनी वेगवेगळया निवेदनाद्वारे जामखेडच्या पोलिस निरीक्षकाचे लक्ष वेधून या रोडरोमिचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी खर्डा पोलिस दुरक्षेत्रात थांबावे पोलिसांनी खर्डा येथे थांबल्यानंतर असे प्रकार घडणार नाही अशीही चर्चा होत आहे.