Breaking News

मतदान यंत्रांबाबत संशयकल्लोळ; राखीव यंत्रे पोचली दोन दिवसांनी; हॉटेलमध्ये ही सापडली


भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम थांबल्यानंतर काँग्रेसने मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) सुरक्षेवरून भारतीय जनता पक्षावर कडाडून प्रहार केला आहे. 

सागर जिल्ह्यात मतदानानंतर ईव्हीएम मुख्यालयात पोहोचण्यासाठी 48 तास लागले होते. शनिवारी ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवत असताना तेथील सीसीटीव्ही कॅमेरे दोन तासांहून अधिक बंद आढळल्याने काँग्रेससह इतर पक्षांनी जोरदार गोंधळ घालत आंदोलन केले. दरम्यान, ईव्हीएम मशीन उशिरा पोहोचल्याने सागर येथील एका नायब तहसीलदारला निलंबित करण्यात आले आहे. 
सीसीटीव्ही कॅमेरा बंद प्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्य निवडणुक अधिकारी (सीईओ) कांता राव यांनी, ट्विट करून मतदारांना विश्‍वास देण्याचा प्रयत्न केला. सर्व ईव्हीएम सुरक्षित आणि सीलबंद असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी वापरण्यात आलेल्या स्कूल बसवर कोणताही रजिस्ट्रेशन नंबर नव्हता. काँग्रेसचे उमेदवार अरुणोदय दुबे यांनी, ईव्हीएम मशीन पोहचण्यात झालेला वेळ आणि रजिस्ट्रेशन नंबर नसलेले वाहन यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. दुबे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात होते. दुबे यांनी हा प्रकार संशय निर्माण करणारा आहे, असे म्हटले आहे. त्याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

मध्य प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी खरगोन जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयात धरणे आंदोलन केले. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी, चांगल्या ईव्हीएम सोबत खराब ईव्हीएम ठेवल्याचा आरोप भाजपवर केला. त्यानंतर खरगोनच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी तसेच पोलिस अधिकार्‍यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राखीव ईव्हीएम ठेवलेले गोदाम आणि स्ट्राँग रूम दाखवले. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. 
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान आणि त्यानंतरही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) मध्ये बिघाड करून हेराफेरी केल्याची तक्रार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांना केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या या हेराफेरीचे तीन व्हिडीओ जारी केले. ते म्हणाले, ‘ज्या-ज्या मतदार संघात काँग्रेस पक्षाची स्थिती भक्कम आहे, तिथे मोठ्या प्रमाणात ईव्हीएममध्ये बिघाड झाले. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांच्या मतदार संघात मतदान झाल्यानंतर दोन दिवसांनी नंबर नसलेल्या बसमधून ईव्हीएम आणली जातात आणि विचारणा केल्यास ती अतिरिक्त असल्याचे सांगितले जाते, हा एकूणच प्रकार गंभीर आहे. ही ईव्हीएम हॉटेलच्या खोल्यांमध्येही आढळली. जी ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये असायला हवीत, ती हॉटेलात कशी, असा सवालही तिवारी यांनी केला. 


25 किलोमीटर अंतरासाठी 48 तास!

केवळ 25 किलोमीटर असलेल्या खुरई येथून सागर येथे 37 ईव्हीएम मशीन घेऊन जाणार्‍या एका स्कूल बससह दोन गाड्यांना तब्बल दोन दिवस लागले. वास्तविक हा प्रवास जास्तीत जास्त एका तासांत व्हायला हवा होता.