Breaking News

मुस्लीम समाजाला विकासाची समान संधी देण्यासाठी कटिबद्ध : श्‍वेताताई महाले उंद्री येथे मुस्लीम शादिखान्याचे केले भूमीपूजनचिखली,(प्रतिनिधी): देशाच्या प्रगतीमध्ये सर्व जाती धर्मियांचा सहभाग असल्यामुळे या प्रगतीचा आणि होणार्‍या विकासाचा वाटा प्रत्येक समाज घटकाला मिळणे गरजेचे आहे. याच न्याय्य भूमिकेतून आपण कार्य करीत असून मुस्लीम समाजालाही विकासाची समान संधी मिळावी यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले यांनी केले. 3 डिसेंबर रोजी उंद्री येथे मुस्लीम शादिखान्याचे भूमीपूजन करतांना त्या बोलत होत्या.

 श्रीमती महाले यांच्या प्रयत्नातून राज्य अल्पसंख्याक निधी अंतर्गत मंजूर झालेल्या 10 लक्ष रुपये किमतीचा शादिखान्याचे काम सुरू झाले असून लवकर ही वास्तू उभी राहणार आहे. उंद्री येथील मुस्लीम समाजाकडून अनेक वर्षांपासून शादिखान्याची मागणी होत होती. परंतु, या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आले. काही दिवसांपूर्वी स्थानिक मुस्लीम बांधवांनी श्‍वेताताई महाले यांना भेटून आपली मागणी त्यांच्या समोर मांडली. श्रीमती महाले यांनी लगेच या संदर्भात प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर केला. एवढ्यावर न थांबता त्यांनी राज्य शासनाकडे या बाबत सतत पाठपुरावा देखील केला.

या प्रयत्नांचे फलीत म्हणून राज्य अल्पसंख्याक निधीमधून 10 लक्ष रुपये मुस्लीम शादिखान्यासाठी शासनाने मंजूर केले. याच निधीमधून सर्व सुविधांनी युक्त अशा शादिखान्याचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर भूमीपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने मुस्लीम पंच कमिटीतर्फे शादिखान्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल श्‍वेताताई महाले यांचा सत्कार करण्यात आला. रहमानभाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात पंच कमिटीचे अध्यक्ष रफीकभाई यांनी श्‍वेताताई महाले यांचा सत्कार केला.

 श्‍वेताताई महाले यांचे नेतृत्व सर्वसमावेशक असून जाती धर्माचा भेदभाव न करता त्या सर्वांना सोबत घेऊन चालतात, म्हणून त्यांच्या विकासकार्याला प्रत्येकाने साथ द्यावी असे आवाहन रफीकभाई यांनी यावेळी बोलतांना केले. शादिखान्यासाठी सतत पाठपुरावा करून शासनाकडून निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांनी श्‍वेताताई महाले यांचे आभार मानले.

पंच कमिटीचे उपाध्यक्ष शेख सुलतानभाई, शेख मुक्तार मौलाना, शेख ईलीयाज, शेख रफीक, शेख बिस्मिल्लाभाई, शेख शाहीदभाई, शेख अमान खान, रब्बानीभाई हे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी मा जितेंद्रजी कलंत्री पंचायत समिती सदस्य, शिवनारायण नखोद, डिगांबर राऊत, महादेव ठाकरे तालुका उपाध्यक्ष भाजपा, गजानन दुधाळे, ज्ञानेश्‍वर वाळके, बलदेवसिंग सपकाळ, अशोक हतागळे, हेमंत पाचखेडे, हबीबभाई, ग्राम सेवक गिरी, गजानन काळे, लक्ष्मण ठाकरे, जलीलभाई, अनिसभाई, राजू लाहूडकार, गणेश जगताप, हारुणभाई, भीमराव आंभोरे, राजकुमार राठी, भोलाभाई, बब्बुभाई, सूलतान भाई, या मान्यवरांसह मुस्लीम समाजबांधव आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय महाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.