Breaking News

भिंगारच्या पेपरवाल्या आजीचा करुण अंत


नगर । प्रतिनिधी -
भिंगार वेशीत गेली अनेक वर्षे ’पेपरवाली आजी’ अशी ओळख असलेल्या जनाबाई जनार्दन कराळे (धनगरगल्ली, भिंगार) या वयोवृद्ध महिलेचा मारुती व्हॅनच्या धडकेत मृत्यू झाला. भिंगार वेशीत काल (दि. 17) सकाळी ही घटना घडली. या अपघातात सदर व्हॅनने फळविक्रेत्यांच्या हातगाड्यांनाही जोरदार धडक दिली.
सकाळी पाथर्डीकडून भरधाव वेगात आलेल्या पिक अप व्हॅनने मारुती व्हॅनला जोराची धडक दिली. यामुळे मारुती व्हॅनने वेगाने पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला वृत्तपत्र विकत असलेल्या या पेपरवाल्या आजीला धडक दिली. व्हॅनचा वेग एवढा होता, की त्या व्हॅनने पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या फळविक्रीच्या हातगाड्यांना धडक देत पेपरवाल्या आजीला तीन फूट फरफटत नेले. यात जखमी झालेल्या कराळे आजीला उपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मयत कराळे यांच्या मागे भाऊ, भाचे असा परिवार आहे. वृत्तपत्रविक्रेते वाघस्कर पाटील यांच्या त्या भगिणी होत. येथील स्मशानभूमी परिसरात कराळे आजीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.