Breaking News

‘शिवदौलत’ बँकेला उत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीर


पाटण : मल्हारपेठ येथील शिवदौलत सहकारी बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचा मानाचा समजला जाणारा पद्मभूषण वसंतरावदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार जाहीर झाला आहे.
आमदार शंभूराज देसाई यांनी सन 2001 मध्ये या बँकेची स्थापना केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी घालून दिलेल्या चाकोरीतून काम करत शिवदौलत या नावातील पावित्र्य जपत केलेल्या प्रगतीमुळेच हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला असल्याचे बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पाटील यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे दरवर्षी राज्यातील सुमारे 500 नागरी सहकारी बँकांतून त्या-त्या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम करणार्‍या सहकारी बँकाचा पुरस्कारांनी गौरव केला जातो. यंदा या पुरस्काराचे 23 वे वर्ष असून या पुरस्कारासाठी बँकेच्या मागील दोन वर्षात स्वनिधीत केलेली सरासरी वाढ, ठेवी व कर्जातील सरासरी वाढ, कर्ज वसुली तसेच एनपीएचे प्रमाण, बँकेचे भांडवल, पर्याप्त प्रमाण नफ्याचे प्रमाण तसेच सीडी रेषो, बँकेचा शाखा विस्तार, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक सेवा, रिझर्व बँकेची ग्रेड व सहकार खात्याचा ऑडिट वर्ग या सर्व बाबींचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो.

शंभर कोटींपर्यंत व्यवसाय असणार्‍या बँकांमध्ये पश्‍चिम महाराष्ट्र विभागातून बँकेला हा पुरस्कार मिळाल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जाधव यांनी सांगितले. शिवदौलत बँकेने अल्प कालावधीत आपली उल्लेखनीय प्रगती करून नावलौकिक मिळवला आहे. बँकेचे सध्या सुमारे 32 हजार ग्राहक असून 83 कोटींच्या ठेवी व 54 कोटीचे कर्ज वाटप आहे. या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बँक यापुढेही प्रगतीचे अनेक टप्पे पार करील, असा विश्‍वास बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पाटील यांनी दिला. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बँकेचे संस्थापक आमदार शंभूराजे देसाई यांनी बँकेचे चेअरमन संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी बँकेचे संचालक वाय. के. जाधव, चंद्रकांत पाटील, सुधीर पाटील, सुनील पवार, मधुकर पाटील, पांडुरंग घाडगे उपस्थित होते.