Breaking News

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल-सोनियांना दिलासा नाही


नवीदिल्लीः ’नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. राहुल आणि सोनिया यांच्याविरुद्ध सुरू असलेला तपास कायम ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला दिले आहेत. 

‘नॅशनल हेराल्ड’ या सध्या बंद पडलेल्या वर्तमानपत्राच्या लखनऊ आणि दिल्लीतील मालमत्ता कथितरीत्या हडपण्यासाठी सोनिया आणि राहुल गांधी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप आहे. काँग्रेसचा नॅशनल हेराल्डच्या स्थावर मालमत्तांवर डोळा होता. ही मालमत्ता हडपण्यासाठी सोनिया आणि राहुल गांधी यांनी यंग इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत घोटाळा केला असा आरोप आहे. सोनिया आणि राहुल गांधीसह सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस आणि सॅम पित्रोदा यांची भूमिका संशयास्पद आहे, असाही आरोप याचिकाकर्ते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे. 

आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत प्राप्तिकर विभागाने कोणताही निर्णय घेऊ नये असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी 8 जानेवारी 2019 रोजी होणार आहे. दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे, तर हा आरोप भाजपने फेटाळून लावला आहे. 
......................