Breaking News

पोखरीच्या ग्रामस्थांसोबत क्षीरसागरांनी केले श्रमदान!

बीड (प्रतिनिधी)- बीड तालुक्यातील पोखरी या गावच्या ग्रामस्थांनी एकीने श्रमदान करत दुष्काळ हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागातून सुरु असलेल्या या मोहिमेत विविध संस्थांच्या सहयोगातून श्रमदान करण्यात येत असतांना ग्रामस्थ, महिला वर्ग व युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. यात राष्ट्रवादीचे युवा नेते संदीपभैय्या क्षीरसागर यांनी सहभागी होत श्रमदान केले. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असून श्रमदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. 

बीड तालुक्यातील पोखरी येथे विविध संस्था, ग्रामस्थ, महिला व युवकांच्या पुढाकारातून दुष्काळ हटवा ही मोहिम राबवल्या जात आहे. या मोहिमे अंतर्गत गावाच्या शिवारात श्रमदान केल्या जात आहे. मोठ्या उत्साहाने सर्वजन या मोहिमेत सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना धीर देण्यासाठी संदीप क्षीरसागर नेहमीच पुढे असतात. पोखरी येथील दुष्काळ हटवा मोहिमेच्या श्रमदानासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर हे गुरुवार दि. ६ डिसेंबर रोजी सहभागी झाले. सहभाग घेऊन त्यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. यानंतर त्यांनी उपस्थित ग्रामस्थ व युवकांशी संवाद साधला. 

जिल्ह्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतमजूरांच्या हाताला काम नाही. जनावरांचे चार्यासाठी माणसाचे पाण्यासाठी हाल होत आहेत. शासन, प्रशासन अशा परिस्थितीत मदतीचा हात द्यायला तयार नाही. पोखरी ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता दुष्काळ हटवा या मोहिमे अंतर्गत श्रमदानाची सुरु केलेली चळवळ कौतुकास्पद आहे. आमचे सर्व सहकारी ही चळवळ गतीमान करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. जिल्ह्यावर आलेलं दुष्काळाचं संकट दुर करण्यासाठी श्रमदान व सहकार्य करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी भाऊसाहेब डावकर व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांचीही उपस्थिती होती.