Breaking News

लाथा घाला; पण युती करा!शिवसेना कधी भाजपशी जुळवून घ्यायचं दाखविते, तर कधी लगेच भाजपवर कडवी टीका करते. कुरवाळण्यापेक्षा पाठीत लाथा घालण्याचं काम शिवसेना जास्त करते. तरीही सत्तेसाठी भाजपला शिवसेनेची साथ हवी आहे. भलेही दररोज पाणउतारा करा; परंतु मला तुमची म्हणा, अशी असं भाजपचा आग्रह आहे. .
गेल्या महिन्यात जेव्हा विदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित नगारा वाजवित होते आणि तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कौतुकाच्या माळा असं गीत गात होते, त्या वेळी या दोन्ही पक्षांत युती होईल, असं वातावरण होतं; परंतु त्यानंतर घडलेल्या घडामोडी पाहता दोन्ही पक्ष परस्परांना खेळवत आहेत, हे चित्र दिसायला लागलं. को्ल्हापूरच्या महापौर निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला मदत करण्याऐवजी काँग्रेस, राष्ट्रवादीला मदत केली. पाच राज्यांत भाजपला फारसं यश मिळालं नाही. तीनच राज्यांत त्यांची सत्ता होती, ती ही गेली. त्यामुळं शिवसेनेचा आवाज आणखीच वाढला. इतका की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणण्यापर्यंत मजल गेली. पंढरपूरमध्ये भाजपवर ठाकरे यांनी केलेली टीका पाहिली, तर कोणत्याही राजकीय पक्षाला स्वाभिमान असता, तर त्या पक्षानं युती तोडून टाकण्याचा निर्णय घेतला असता; परंतु सत्तेासाठी मान, अपमान सारंच झूट असतं. भाजपचे नेते, कार्यकर्ते संवेदनाहीन झाले आहेत. सत्तेसाठी त्यांना पदोपदी अवमान गिळण्याची वेळ आली आहे. विरोधकांनी जेवढा पाणउतारा केला नाही, त्याहून अधिक पाणउतारा शिवसेना करते आहे. तरीही अवमान गिळून भाजप युतीसाठी शिवसेनेचे उंबरठे झिजवित आहे. मातोश्रीच्या पाय-या चढताना स्वाभिमान नावाचं काही शिल्लक नसतं, त्याचा विसर भाजपला पडला आहे. कोल्हापूरचा बदला नगरमध्ये घेऊन भाजपनं शिवसेनेला सत्तेपासून वंचित ठेवलं. असं असलं, तरी शिवसेनेनं त्याचं जे वातावरण केलं, त्यामुळं भाजपलाच पुन्हा एकदा मूग गिळून बसावं लागलं आहे. भाजपला लफडं करणारा पक्ष अशी उपमा देऊनही मुख्यमंत्र्यांनी अजून युतीची आशा सोडलेली नाही. उलट, युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलवला आहे. 

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना युती हवी आहे. युती झाली नाही, तरच महाराष्ट्रात आहे, त्या जागा टिकविता येतील, असं सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. युती झाली नाही, तर भाजपचा जेवढा तोटा होईल, त्याहून जादा तोटा शिवसेनेचा होणार आहे. असं असलं, तरी भाजपवर तुटून पडल्याशिवाय सरकारविरोधातील नाराजी आपल्याला कॅश करता येणार नाही, असं शिवसेनेला वाटतं. त्यामुळं सत्तेची फळं चाखायची आणि त्याचवेळी भाजपवर तुटून पडताना विरोधकांचं अवकाशही आपलंच आहे, अशा पद्धतीनं शिवसेनेची वाटचाल चालू आहे. हे अजाणतेपणी होत नाही, तर जाणतेपणी होतं आहे. भाजपला मात्र पदोपदी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं. आगामी वर्षात सर्वात मोठं आव्हान हे निवडणुकांचं असणार आहे. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला जिंकायचं आहे. आम्हाला वेगळं व्हायचं नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिले आहेत; मात्र आता युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलावल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. राज्यासमोर दुष्काळाचं आव्हान मोठं आव्हान आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न समोर उभा आहे, त्याला सरकारला सामोरं जायचं आहे. असं असलं, तरी मुख्यमंत्र्यांनाच सर्वांत मोठं आव्हान लोकसभा निवडणुकीचं वाटतं आहे. त्यावरून मूलभूत प्रश्‍नांपेक्षाही निवडणुकातला विजय राजकीय पक्षांसाठी किती महत्त्वाचा असतो, हे लक्षात यायला हरकत नाही. विशेष म्हणजे या निवडणुका जिंकून पुन्हा केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार आणायचं आहे, हेच आमच्यासमोरील सर्वांत मोठ आव्हान असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. याचा अर्थ त्यांनाही लोकसभेच्या निवडणुकीत तसंच विधानसभांच्या निवडणुकीतील लढाई सोपी राहिलेली नाही, हे स्पष्ट होतं. शिवसेनेलाही ही वस्तुस्थिती कळत नसेल, असं कुणीच म्हणणार नाही; परंतु आपला दबाव वाढवित नेऊन लोकसभेच्या आणखी काही जागा आणि विधानसभेच्या किमान 125 जागा मिळाव्यात, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सेना-भाजपची युती होणार का, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. या प्रश्‍नाचं उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. कारण, युतीबाबात भाजपची आग्रही भूमिका आहे; पण शिवसेनेकडून कोणताही ठोस प्रतिसाद देण्यात येत नाही. त्यामुळं युतीचे कोडं अद्याप उलगडलं नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण देताना, युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे.


’चौकीदार चोर है’ अशी टीका करणार्‍यांनाही नववर्षाच्या शुभेच्छा देणार का, असा प्रश्‍न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांच्या चेहर्‍यावरचे भाव आणि सूर बदलला. ठाकरे यांना योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देऊ, असं पालुपद मुख्यमंत्र्यांनी चालू ठेवलं आहे. ठाकरे यांना जशास तसं उत्तर देणार असल्याचं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं असलं, तरी ही योग्य वेळ कधी येणार, की युती झाल्यानंतर टीकाही हवेत विरणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ’ते कुणाला म्हणाले, काय म्हणाले, याची माहिती घेऊच. मी योग्य वेळी उत्तरही देणार आहे. प्रत्येकाची योग्य वेळ असते. ती योग्य वेळ येणार आहे आणि उत्तरही देणार आहे, असं त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता निक्षून सांगितलं. अर्थात, त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असल्याचंही ते म्हणाले.
शिवसेना रोज नरेंद्र-देवेंद्र जोडीवर टीकेचे बाण सोडत स्वबळाचे नारे देत आहे. भाजपसोबत सत्तेत सहभागी असूनही सरकारच्या अनेक धोरणांना विरोध करत आहे. त्यामुळं युतीतील दरी वाढतच चालली आहे. अयोध्या दौरा करून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला थेट आव्हान दिलं. त्यानंतर, पंढरपूर इथल्या जाहीर सभेत त्यांनी चक्क ’चौकीदार चोर है’ म्हणून पंतप्रधान मोदींना आरोपीच्या पिंजर्‍यातच उभं केलं. स्वाभाविकच, ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे. तरीही, पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर ताकही फुंकून पिणारे भाजप नेते युतीसाठी प्रयत्न करताहेत. या पार्श्‍वभूमीवर, ’योग्य वेळी त्यांना उत्तर देऊ’, असं ठणकावून सांगत फडणवीस यांनी बरंच काही सूचित केलं आहे.

अहमदनगर महापालिकेत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष असतानाही भाजपनं राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळवलं; परंतु यासाठी सर्वस्वी शिवसेनाच जबाबदार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास त्यांना बिनशर्त पाठिंबा द्या, असे आदेश मी स्वतः दिले होते. मात्र शिवसेनेनं अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कुठलाच प्रस्ताव दिला नाही, मग अखेर स्थानिक नेत्यांनी महापौरपदाची निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीनं स्वतःहून आम्हाला पाठिंबा दिला, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यातून शिवसेनेवरच जबाबदारी ढकलली असली, तरी भाजपनं ही युती धर्म न पाळता राष्ट्रवादीला सोबत घेतलं. इथं शिवसेनेनं भाजपला विचारलं नाही, तसं भाजप स्वतः होऊन पाठिंब्यासाठी पुढं आला नाही, हे खरं आहे. कुणी कुणाला मनवायचं हा प्रश्‍न असेल, तर भाजपनं युतीसाठी हालचाल केली नाही, तर मग मोठा पक्ष असलेल्या भाजपला तडाखा द्ल्यिाशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. आम्हीही बुडू; परंतु तुम्हाला सोबत घेऊनच बुडू अशी ही दोघांची नीती दिसते.