Breaking News

दखल- राज-उद्धव यांचा एकताली सूर; संजय मात्र बेसूर

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातला कौटुंबिक जिव्हाळा वगळता इतर बाबतीत त्यांचं फारसं मतैक्य झालेलं नाही; परंतु भाजपविरोधात टीका करताना दोघांची भाषा सारखीच असते. उद्धव व राज परस्परांवर टीका करतात. आता तर त्या दोघांची पावलं एकाच दिशेनं पडताना दिसत होती. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या प्रकारानंतरची राज व उद्धव यांची वक्तव्यं एकाच सुरातली असताना खासदार संजय राऊत यांनी मात्र बेसूर लावला आहे...
लोकमंथनच्या पाच डिसेंबरच्या अंकातील दखलमध्ये दंगलीच्या तप्त वातावरणावर मतांची पोळी असं लिहिलं. तोच सूर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावला. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या पोलिस महानिरीक्षकांचाही संशय असाच आहे. 

गोहत्येचं ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल उद्धव यांनी भाजपला केला आहे. त्यांच्या या सवालाला केवळ बुलंदशहराचीच पार्श्‍वभूमी नाही, तर त्याला तीन वर्षांपूर्वी घडलेलं दादरीचं हत्याकांड आणि त्याअगोदरची मुझफ्फरनगरच्या दंगलीची पार्श्‍वभूमी आहे. कथित गोहत्येच्या मुद्द्यावरून बुलंदशहर येथे झालेल्या हिंसाचारावरून शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं आहे. मुस्लिमांचा उत्सव ज्या ठिकाणी होता, त्यापासून बुलंदशहर पन्नास किलोमीटर आहे. मृत जनावरांती शवं पोलिस ठाण्यात आणून त्याआधारे गाईंची कत्तल केल्याचा संशय निर्माण करून दंगली घडविण्याचा हा प्रकार असावा, असा खुद्द् पोलिस महासंचालकांचा संशय आहे. त्याअगोगदरच उद्धव यांचं वक्तव्य आलं आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशात जाऊन आल्यानंतर तिथं मिळालेला प्रतिसाद पाहून शिवसेनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आदी राज्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरून काही जागा मिळविता येतील का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशमधील 80 जागा लोकसभेच्या निवडणुकीत निर्णायक आहेत. उत्तर प्रदेशात महाआघाडी झाली, तर भाजपच्या जागांची संख्या गेल्या वेळच्या 72 जागांच्या निम्मी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळं या 80 जागांसाठीच गोहत्येचं ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्‍न उद्धव यांना पडला आणि त्यांनी त्याबाबत भाजपला जाब विचारला आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये उसळलेल्या दंगलीमागं काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असल्याचं उघड झालं. या दंगलीत एका पोलिस अधिकार्‍यासह अन्य एकाचा मृत्यू झाला होता. या दंगलीमागच्या मुख्य सूत्रधाराला मंगळवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. उद्धव यांनी त्यांच्या मुखपत्राच्या अग्रलेखातून बुलंदशहरमधील हिंसाचार प्रकरणी भाजपवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या 80 पैकी 72 जागा जिंकल्यानंच 2014 मध्ये भाजपचं केंद्रातील बहुमताचं सरकार होऊ शकलं; मात्र 2019 मध्ये त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. त्यात सर्व विरोधक एकत्र आले, तर भाजपचा पराभव होऊ शकतो, हे ‘कैराना’ लोकसभा पोटनिवडणुकीनं दाखवून दिलं आहे. त्यामुळं 2014 च्या निवडणुकीपूर्वी जसं ‘मुझफ्फरनगर’ आणि मध्यंतरी ‘कैराना’ घडवलं गेलं तसं आता ‘बुलंदशहर’ घडवून आणलं जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बुलंदशहरातील हिंसाचारावरून मोदी यांनी कान उपटूनही तथाकथित गोरक्षकांचा उन्माद कमी झालेला नाही हेच दिसतं. गोरक्षणाच्या नावानं उन्माद करणार्‍यांनाही नंतर कायद्याचे दंडुके, तुरुंगवासाचे चटके सहन करावे लागतात; मात्र गोरक्षणाच्या आडून हिशेब चुकते करणारे आणि त्याद्वारा धार्मिक धृवीकरण घडवून मतांच्या पोळया भाजून घेणारे नामानिराणे राहतात,’ असं उद्धव यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी नेमकं राज यांनीही भाजपवर अशाच पद्धतीची टीका केली. त्यांच्या टीकेचा रोख थोडा वेगळा होता. 

ओवैसीसारख्या लोकांना हाताशी धरून देशात दंगली घडविण्याचा कट भाजप आखत आहे, असा आरोप राज यांनी केला. राम मंदिर हे 2019 च्या निवडणुकीनंतर व्हायला हवं; परंतु सरकारला तेवढा वेळ नाही. त्याचं कारण सरकारला हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करायचं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशातील जनतेच्या भावनांशी खेळ सुरू आहे. सत्तेवरील भाजप सरकारनं गेली साडेचार वर्षे विकासकामं केली नाहीत. त्यामुळं जनतेसमोर त्यांच्याकडं दाखवण्यासाठी काहीच नाही. नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लिम दंगली घडवून निवडणूक लढवायची आहे, असा गंभीर आरोप राज यांनी केला आहे.

युती तर करायची; परंतु भाजपवर सातत्यानं टीका करीत राहायची, भाजपनं या टीकेकडं फारसं गांभीर्यानं पाहायचं नाही, असा दोघांत अलिखित करार झाला आहे. दुसरीकडं उद्धव यांनी उत्तर प्रदेशात जायचं. उत्तर भारतीयांशी जुळवून घ्यायचं, त्याचवेळी उत्तर भारतीयांच्या मंचावर जाऊन राज यांनीही सुसंवाद साधायचा, हे एकाएकी होत नाही. मतांच्या राजकारणासाठी हे चालू आहे, हे स्पष्ट आहे. मुंबई, वाशीममधल्या सभेतून उद्धव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीसाठी युती करण्याचे संकेत देत असताना दुसरीकडं उद्धव यांनी दुष्काळाच्या प्रश्‍नावर राज्य सरकार कुंभकर्णी झोपेत असल्याची टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणू नका, असं खासदार संजय राऊत जेव्हा सांगतात, तेव्हा राज्य सरकारवर केलेली टीका ही सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांवर नाही का आणि या टीकेमुळं मुख्यमंत्री अडचणीत येत नाहीत का, हा प्रश्‍न राऊत यांनाही पडत नसावा. महाराष्ट्राला आपण पुरोगामी राज्य म्हणतो. आपण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर केला. त्यामुळं कायद्याचं रक्षण ठेवणार्‍यांनी यांचं भान ठेवावं. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणू नका अशी टीका राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे. आता याचा सोईचा अर्थ काढला जाईल हा भाग वेगळा. मुख्यमंत्री म्हणजे दैवी शक्ती आहे असं वक्तव्य महाजन यांनी केलं होतं. त्यावर राऊत यांनी ही टीका केली आहे. जादूटोणा, दैवी शक्ती याला राज्याच्या कायद्यात विरोध आहे. दैवी शक्ती असेल, तर मग या शक्तीनं महाराष्ट्रातील दुष्काळ दूर करावा, असं त्यांचं म्हणणं मात्र योग्य आहे. राम मंदिरासंदर्भात हिंदू-मुस्लिम वाद होऊ शकत नाही. ज्यांना राजकारण कळतं, त्यांना हे चांगलंच माहीत आहे. राम मंदिरावरून आता काही दंगल होणार नाही. कारण हा मुद्दा आता मंदिरापुरताच उरला आहे. बाबरीचा विषय कधीच संपला आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
हिंदू-मुस्लिम दंगलीच्या मुद्द्यांवरून राऊत यांनी राज ठाकरेंना फटकारलं. ज्यांच्याकडं हिंदू-मुस्लिम दगंलीच्या बाबतीत माहिती आहे, त्यांनी पोलिसांनी कळवावी असा टोला राऊत यांनी राज यांना लगावला. तसं असेल, तर मतांच्या धुव्रीकरणासाठी रक्तरंजितपर्व घडवण्याची उद्धव यांची टीका राज यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी कशी, असा प्रश्‍न विचारता येईल. आपल्या म्हणण्याचा अर्थ तसं असेल, तर मतांच्या धुव्रीकरणासाठी रक्तरंजितपर्व घडवण्याची उद्धव यांची टीका राज यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी कशी, असा प्रश्‍न विचारता येईल. आपल्या म्हणण्याचा अर्थ वेगळा आणि त्यांच्या वेगळा असं सांगून वेळ मारून नेता येत असली, तरी दोघांच्या सुरात तिसर्‍याचा बेसूर असं म्हणायला जागा आहे.