Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा; प्रकरण दडपण्यास मदत करणार्‍या आजीवरही ठपका


रहिमतपूर (प्रतिनिधी) : येथील मातंगवस्तीमधील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणार्‍या युवकाविरुद्ध रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार लपवून ठेवण्यासाठी मदत केल्याप्रकरणी संबंधिताच्या आजीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय बाळासाहेब नेटके (रा. बेघरवस्ती रहिमतपूर) असे संशयिताचे नाव असून संबंधिताच्या आजीवरही रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, रहिमतपूर येथील मातंग वस्तीमध्ये राहणार्‍या एका अल्पवयीन युवतीला एक असाध्य आजार जडला आहे. त्या आजारावर औषधे घेण्यासाठी ती युवती सातार्‍यातील जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये गेली होती. तेव्हा तिच्या घराशेजारी राहणार्‍या अजय बाळासाहेब नेटके या मुलाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिला मोटरसायकलवरून जानाई मळाईच्या डोंगरात नेले व लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तू सज्ञान झाल्यावर आपण लग्न करू, असे आमिष दाखवत तो पीडितेवर वारंवार अत्याचार करीत असे. 

या प्रकाराबद्दल पीडितेच्या चुलत भावाला सुगावा लागल्याने त्याने अल्पवयीन युवतीस याबाबत समजवण्याचा प्रयत्न केला व संशयित अजय नेटके यालाही फोनवरून याबाबतचा जाब विचारला. मध्यंतरी दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अजय नेटके याने संबंधित अल्पवयीन मुलीला सातार्‍यात नेले व आपण उद्या सातार्‍यातच लग्न करून मुंबईला निघून जाऊ, असे सांगितले. तसेच त्या युवतीला सातार्‍यात महामार्गालगतच्या एका लॉजवर नेले व सायंकाळी चार वाजल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याच रात्री उशिरा अजय नेटके याने त्याच्या घरी फोन करून आपण लग्न केले असल्याचे सांगितले. त्यानंतर नेटके याच्या घरातल्या व्यक्तींनी मुलगी सज्ञान झाल्यावर लग्न लावून देऊ असे कबूल केल्याचे संबंधित पीडीत मुलीला सांगितले. त्यांच्या बोलण्यावर पीडित मुलीने विश्‍वास ठेवला. त्यानंतर शुक्रवार, दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता अजय नेटके याने फोन करून संबंधित पीडीत युवतीला तुझ्या आजारामुळे माझ्या घरातील लोकांचा लग्नाला विरोध आहे, असे तिला सांगितले. तसेच याप्रकरणी त्याच्या आजीने संशयित नेटके याला साथ दिल्याने तिच्याविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनि घनशाम बल्लाळ करत आहेत.