Breaking News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेने वृद्धाला लुटले

नगर । प्रतिनिधी -
माणुसकीच्या भावनेतून एका अनोळखी महिलेला लिफ्ट देऊनही पश्चाताप करण्याची वेळ एका वृध्द इसमावर आली आहे. लिफ्ट दिलेल्या महिलेने विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन एका वृध्दास लुटल्याचा प्रकार आज (मंगळवार) दुपारी दिल्लीगेट ते सावेडीदरम्यान घडला. त्यानंतर या वृध्दाने ‘अहमदनगर घडामोडी’च्या कार्यालयात येऊन घडलेला हा प्रसंग सांगितला. 

भिस्तबाग येथील एक 65 वर्षीय वृध्द आज (मंगळवार) दुपारी नगर शहरातून दुचाकीवर सावेडीकडे चालले होते. दिल्लीगेट येथे एका अंदाजे 35 वय असलेल्या महिलेने या वृध्दाला लिफ्ट मागितली. तिने तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला होता. तिच्या हातात गुलाबी रंगाची पर्स होती. केडगावची राहणार असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे या वृध्दाने तिला लिफ्ट दिली. जिल्हा रुग्णालयाजवळ उतरण्याचे सांगून ही महिला या वृध्दाच्या दुचाकीवर पाठीमागे बसली. जिल्हा रुग्णालयाजवळ आल्यानंतर या महिलेने प्रेमदान चौकात जायचे आहे, असे सांगितले. 

त्यानंतर प्रेमदान चौकात गेल्यावर आणखी पुढे जायचे सांगत ही महिला दुचाकीवर तशीच बसून राहिली. डौले हॉस्पिटलजवळ आल्यानंतर या वृध्दाने दुचाकी थांबविली. यावेळी ‘मला ओळखले नाही का, मी कोण आहे, तुम्हाला माहित नाही का, मला हजार रुपये द्या, नाहीतर मी तुमच्यावर विनयभंगाची केस करीन’ असे म्हणून ही महिला मोठ्या आवाजात बोलू लागली.

त्यानंतर तेथे नागरिक जमू लागल्याने गडबडलेल्या या वृध्दाने आपल्या खिशातील 600 रुपये काढून या महिलेच्या हातावर टेकवले. त्यानंतर ‘अहमदनगर घडामोडी’च्या भिस्तबाग चौकातील कार्यालयात येऊन त्यांनी हा घडलेला प्रसंग सांगितला.

माणुसकीच्या भावनेतून लिफ्ट देऊनही विश्वासघात केल्याने त्या महिलेला धडा शिकविण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली. त्या महिलेने आणखी कोणाला असे लुटू नये, यासाठी फिर्याद देणार असल्याचेही ते म्हणाले. तद्नंतर ते तक्रार देण्यासाठी तोफखाना पोलिस ठाण्यात गेले.