Breaking News

विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रातच यशाची उंची गाठावी : आ.सपकाळ


बुलडाणा,(प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी स्वत:ला प्रामाणिकपणे झोकून दिल्यास आवडेल त्या क्षेत्रात यश संपादन करता येते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी ध्येयवेडे होऊनच यशाची उंच शिखर गाठावी असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. येथील शिवाजी विद्यालयात डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. स्नेहसंमेलनाचे उदघाटक म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, आजीवन सदस्य अ‍ॅड. प्रतापराव भोंडे, भालचंद्र पवार, विशेष निमंत्रित सदस्य सुभाषराव पाटील, आजीवन सदस्य सखाराम सोनुने, डॉ. रामदास भोंडे, राणा चंदन, दत्ता काकस हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांनी हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्रीकांत हिंगे व त्यांच्या चमूने स्वागत गीत सादर केले. सुरुवातीला सर्व मान्यवरांचे प्राचार्य दिलीप पराते यांनी विद्यालयाच्या वतीने स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिलीप पराते यांनी केले. जयंती महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ यांनी उद्घाटन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. रविकांत तुपकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याला सलाम केला. यानंतर कॉलेज डायरी या मराठी सिनेमाचा अभिनेता प्रताप गाडेकर यांनी नृत्य सादर करून विद्यार्थ्यांना उत्साहित केले. तर प्रताप गाडेकर व भाग्यश्री पाटील यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एच. राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन जी. एस. जाधव यांनी केले. त्यानंतर मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, पाककृती, पुष्प प्रदर्शन आदी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डी. पी. म्हस्के, जे. व्ही. धोरण, ए. पी. देशमुख, डॉ. विकास बाहेकर, पी. टी. जाधव, ए. आर. सरोदे, संदीप पाटील, माणिकराव गवई, सुयोग नारखेडे, किशोर साबळे, सुनील नगराळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.