Breaking News

कळवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावरकळवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावरनाशिक – कळवण मधील नांदुरी येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर सतत गैरहजर असून अपघातातील रुग्ण व इतर रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे यांना करूनही ते आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी असे निवेदन राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी आरोग्य सेवा उपसंचालक रत्ना रावखंडे यांना दिले.
       प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरी (ता.कळवण जि.नाशिक) येथे अपघात झालेले तसेच इतर रुग्ण येत असतात. या आरोग्य केंद्रातील डॉक्टर सतत गैरहजर असल्याने रुग्णांवर प्राथमिक उपचार न करताच जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला रुग्णांना दिला जातो. आरोग्य केंद्रातील डॉक्टर सतत गैरहजर असल्याने अपघातातील गंभीर रुग्णांना प्राथमिक उपचार मिळत नाही. त्यामुळे रुग्ण परिचारिका व वाहनचालकांच्या भरोशावर असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातील जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत असलेल्या रुग्णवाहिका हि गरोदर माता व बाळांच्या उपचारासाठी असूनही तिचा वापर अपघातातील रुग्णांना हलविण्यासाठी करण्यात येत आहे.        जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमातंर्गत असलेले कंत्राटी वाहनचालक श्री.गंगाराम गायकवाड यांनी या प्रकरणाची माहिती वादग्रस्त आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे यांना दुरध्वनीद्वारे दिली. परंतु डेकाटे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सतत गैरहजर असलेले डॉ.सिद्धू यांनाच पाठीशी घालण्याचे काम करून अपघातग्रस्त रुग्णाला जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमातंर्गत असलेल्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. डॉ.विजय डेकाटे हे नाशिक महापालिकेत असताना घंटागाडी कामगारांचे वेतन अदा न करताच घंटागाडी ठेकेदाराला त्यांचे देयक अदा करण्यात आले होते. त्यांचे घंटागाडी ठेकेदाराशी असलेल्या संबंधामुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तसेच वैद्यकीय अधिक्षक असताना  पंचवटीतील मायको दवाखान्यातील डॉक्टर व परिचारिकांच्या गैरहजेरीमुळे गरोदर महिलेची प्रसूती रिक्षात झाल्याचा प्रकार घडला होता. तेव्हाही डॉ.डेकाटे यांनी संबधित डॉक्टरांना पाठीशी घातले होते.  आता त्यांची बदली जिल्हा परिषदेवर आरोग्य अधिकारी पदावर करण्यात आली आहे. येथे त्यांचा तोच भोंगळ कारभार सुरु असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना पाठीशी घालण्यासाठी ते गैरव्यवहार करत असल्याचा वास येऊ लागला आहे. या सर्व प्रकरणावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देण्याची गरज असून डॉ.विजय डेकाटे सह प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वर सविस्तर चौकशी करावी जेणेकरून नाशिक मनपा हद्दीतील मायको रुग्णालयात झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.
       याप्रसंगी शहराध्यक्ष गणेश पवार, कार्याध्यक्ष गणेश गांगुर्डे, प्रविण साळुंके, अनिकेत कपोते, अनिल ठाकरे, निलेश शिरसाठ, सागर साळुंके, प्रतिक कापडणीस, सागर पाटील, आकाश घाटोळ, आकाश नेटके, जितेंद्र पाटील, अविनाश डुंबरे, गणेश व्यवहारे, राहुल पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.