Breaking News

कोरेगावच्या आमदारांच्या दत्तक गावातच विकासाचा फज्जा


वाठार स्टेशन (प्रतिनिधी) : कोरेगावच्या आमदारांनी दत्तक घेतलेल्या देऊर गावातच विकासकामांचा फज्जा उडाला आहे. देऊर गावचा पाणी प्रश्‍न मार्गी लावल्याचा मला खूपच आनंद होत आहे. आमदारांनी कायम या उत्तरेकडील गावांना विकासकामांपासून झुलवत ठेवले आहे. आता मात्र जनताच त्यांना परखड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, अशी टिका भाजपचे नेते महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता केली आहे. 

मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या मंजूर झालेल्या कामाच्या भूमिपूजनावेळी ते देऊर येथे बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम, संतोष जाधव, सुरेश आफळे, किसनराव कदम, शांताराम दोरके, अशोकराव कदम, गोकुळ रानभरे, बाळासाहेब कदम यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होेती. या योजनेचे भूमिपूजन केल्यावर महेश शिंदे व मान्यवरांनी ग्रामस्थांशी संवाद साधला व पंचक्रोशीच्या विकासासाठी कटीबध्द राहाणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम म्हणाले की, तालुक्याच्या विकासासाठी अनेक योजनांचा महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तालुक्यामध्ये अनेक योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. याप्रसंगी संतोष जाधव, सुरेश आफळे, किसनराव कदम, शांताराम दोरके यांचीही या वेळी भाषणे झाली.