Breaking News

परप्रांतीय मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
अंबाजोगाई, (प्रतिनिधी)- रेणापूर ते लोखंडी सावरगाव दरम्यान अंबासाखर कारखाना येथे वाघाळा पाटीजवळ महामार्गाच्या कामासाठी सिमेंट कॉन्क्रीट टाकणे सुरु असताना केएम मशीन मध्ये विद्युत प्रवाह उतरला. यावेळी मशीनवर हात टेकून थांबलेल्या परप्रांतीय मजुराचा विजेच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता घडली. सहाउद्दीन बशीर अहमद (वय २७, रा. गोविंदपूर, बिहार) असे त्या मजुराचे नाव आहे. तो रेणापूर ते लोखंडी सावरगाव दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर कामासाठी आलेला होता. सध्या हे काम प्रगतीपथावर वाघाळा पाटी येथे पुलाचे काम सुरु आहे. बुधवारी सकाळी या ठिकाणी केएम मशीनमधून सिमेंट कॉन्क्रीट खाली करणे सुरु होते.

यावेळी सहाउद्दीन हा मशीनवर हात ठेऊन उभा होता. मशीनचे फालके वर जाताच वरून जाणार्‍या ११ केव्ही विद्युत प्रवाहाच्या तारेजवळ गेल्याने मशीनमध्ये विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे मशीनवर हात ठेवलेल्या सहाउद्दीन यास जोराचा झटका बसून तो फेकल्या गेला. इतर कामगारांनी त्याला तातडीने स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.