महाआरोग्य शिबीराचा ७ हजार ७९१ रूग्णांनी घेतला लाभ


परळी,(प्रतिनिधी):गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य यज्ञाने आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांना हजारो गोरगरीब रूग्णांच्या आशीर्वादाचे बळ मिळाले. 

महाआरोग्य शिबिराचा ७ हजार ७९१ रूग्णांनी लाभ घेतला तर ४१४ रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. जिल्हयाच्या खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांनी अन्य डॉक्टरांसोबत स्वतः दोन दिवस शिबीरात बसून रूग्णांची तपासणी केली हे या शिबीराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर काल महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले होते. आज या शिबीराचा समारोप झाला. या शिबिराला परळी, अंबाजोगाई व परिसरातील रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. नितीन चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी व खासगी असे दोनशेहून अधिक डॉक्टर्स आरोग्य यज्ञात सहभागी झाले होते. शिबीरात ७ हजार ७९१ स्त्री- पुरूष रूग्णांसाठीच्या ४२ विविध स्टॉल्समधून कॅन्सर, किडनी यासह ५० हून अधिक रोगांच्या तपासण्या डॉक्टरांनी केल्या. सोनोग्राफी, इसीजी, रक्त, लघवी तपासणी, औषधी वाटप याबरोबरच शेतक-यांना आत्महत्ये पासून परावृत्त करण्याबाबत मार्गदर्शन तसेच तंबाखू व्यसनमुक्ती नियंत्रण, एड्स, मलेरिया, क्षयरोग याविषयी जनजागृती, किशोरवयीन मुला मुलींना मार्गदर्शन, महात्मा फुले जीवनदायी योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेविषयी रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. जयपूर फुट व अपंगाना विविध साहित्याचे वितरणही यावेळी करण्यात आले. 
आरोग्य यज्ञ झाला सफल 
ना. पंकजाताई मुंडे यांनी सुरू केलेल्या आरोग्य यज्ञाचा दुष्काळात सापडलेल्या गोरगरीब रूग्णांना ख-या अर्थाने फायदा झाला. आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांना आजारांवर उपचार घेणे शक्य नव्हते ते या शिबीरामुळे शक्य झाले. शिबीरात रूग्णांची केवळ तपासणीच नव्हे तर औषधोपचार आणि शस्त्रक्रियाही मोफत उपलब्ध झाल्याने गोरगरीब रूग्णांनी मुंडे भगिनींना मनापासून आशीर्वाद दिले. 


खा.डॉ. प्रितमताई मुंडेंनी केली तपासणी खासदार डॉ प्रितमताई मुंडे हया स्वतः त्वचारोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून या शिबीराचे उत्कृष्ट नियोजन तर केलेच शिवाय डॉक्टर म्हणून स्वतः दोन्ही दिवस इतर डॉक्टरांच्या बरोबरीने शिबीरात बसून रूग्णांच्या तपासण्या केल्या. डॉक्टर व खासदार अशा दोन्ही भुमिका अगदी सहजपणे पार पाडत असतांना त्यांच्याविषयी रूग्णांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. 


डॉक्टरांची बजावली महत्वपूर्ण भूमिका या शिबीरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी व खासगी डॉक्टरांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली. परळी उप जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर लटपटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, डॉ. हरदास, डॉ. हरिश्चद्र वंगे, डॉ. सुर्यकांत मुंडे, डॉ. राजाराम मुंडे, डॉ. मधूसुदन काळे, डॉ. बालासाहेब कराड, डॉ. ज्ञानेश्वर घुगे, डॉ. सतीश गुठे, डॉ. लक्ष्मीनारायण लोहिया, डॉ. अर्शद शेख, डॉ. सचिन भावठाणकर, डॉ. अनिल घुगे, डॉ. शीतल गायकवाड, डॉ. पवार, डॉ. मुकूंद सोळंके, डॉ. अजय मुंडे, डॉ. अजित केंद्रे, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे, डॉ. विजय रांदड, डॉ. शालिनी कराड, डॉ. वैशाली गंजेवार, डॉ. दैवशाला घुगे, डॉ. रंजना घुगे, डॉ. नेहा अर्शद, डॉ. सुनिता झंवर यांनी यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget