Breaking News

रविवारी धनगर आरक्षण परिषदेसह एल्गार मेळावा


सातारा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने धनगर आरक्षण परिषद व एल्गार मेळावा रविवार, दि. 16 रोजी सायंकाळी 5 वाजता लोणंद येथील बाजारतळ पटांगणात आयोजित केला असल्याची माहिती माजी सभापती रमेश धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, या मेळाव्यासाठी गावनिहाय भेटी, बैठका घेवून जनजागृती करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला असताना त्याची अंमलबजावणी न करता आतापर्यंतच्या सरकारने धनगड व धनगर मधील ड आणि र या शब्दात अडकवून ठेवत झुलवत ठेवले आहे. 

भटका समाज असल्याने त्यांची जनगणानाही केलेली नाही. गेल्या काही वर्षापासून आरक्षणाबाबत समाजाच्यावतीने शेळ्यामेंढ्यासह, पारंपरिक गजीनृत्य करत रस्त्यावर उतरुन काढलेले विविध मोर्चे ठिय्या आंदोलने, रास्ता रोको, आमरण उपोषणे आदि माध्यमातून लक्ष वेधण्याचे काम केले आहे मात्र, सरकारने याची दखल घेतलेली नाही. 2014 मध्ये पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढली होती. तसेच बारामतीमध्ये आमरण उपोषण करण्यात आले असताना तत्कालिन भाजप प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगड व धनगर याचा मी अभ्यास केला असून आमच्या हातात सत्ता द्या, कॅबिनेटच्या पहिल्या मिटींगमध्ये धनगर समाजाला आरक्षण देवू असे लेखी पत्र दिले होते. भाजप सत्तेत येवून चार वर्षे उलटली, कॅबिनेटच्या शेकडो मिटींग झाल्या परंतु त्यांना आपल्या आश्‍वासनाचा विसर पडला आहे यामुळे समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. आताही आरक्षणाचा अखेरची लढाई खंडाळा तालुक्यात होत आहे या एल्गार मेळाव्यातून शासनाला जाग येईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा 2019 च्या नवीन वर्षात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.