Breaking News

संत शिरोमणी रोहिदास महाराज क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने महामानवांना अभिवादनचिखली,(प्रतिनिधी): भारत देशामध्ये अनेक थोर संत तसेच महामानव होऊन गेले असून त्यांच्या विचारांची ज्योत आजही कायम तेवत आहे. त्यांच्या विचारांमुळेच आज विविध समाजामध्ये सामंजस्य कायम राहिले असून त्यांच्या विचारांमुळेच समाजात कायम एकोपा राहत असतो.

संत शिरोमणी रोहिदास महाराज क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने तसेच  समाज बांधवांच्या वतीने  संभाजीनगर येथे 14 रोजी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजीनगर परिसरात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संत रविदास महाराज, महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी चिखली शहरातील नामवंत विधीज्ञ तथा सेवानिवृत्त न्यायाधीश सुरेश घोरपडे यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेव सिरसाट तथा सुरेश घोरपडे यांनी महामानवांच्या चरित्राविषयी माहिती विषद करीत त्यांचे योगदान समाजाकरिता नेहमीकरिता बहुमुल्य असल्याचे सांगितले. तर सुरेश घोरपडे यांनी तीनही महामानवांविषयी सखोल माहिती देत त्यांच्या विचारांची समाजाला खरी गरज असल्याचे सांगून सर्व समाजातील नागरिकांनी त्यांच्या जयंती तथा पुण्यतिथी साजरी करण्याचे आवाहन केले. हे महापुरूष कोणत्याही एका समाजाकरिता मर्यादित राहिले नसून त्यांचे योगदान हे अखिल मानवाच्या कल्याणकरिता नेहमीच उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज शिपणे यांनी तर आभार संस्थेचे अध्यक्ष विजय खरे यांनी मानले. यावेळी संत शिरोमणी रोहिदास महाराज  क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मोतीराम निंबोळे, कोषाध्यक्ष संजय चंचरे, सचिव राजकुमार खन्सरे, रमेश जोहरे, विष्णु जोगदंडे, हिरामण डोंगरे, विनोद खरे, सुरेश खरे, जाधव सर, डोंगरदिवे, सुधाकर मघाडे, मिलिंद मघाडे, पुरूषोत्तम चांदोरे, मंगलाताई पठ्ठे, कमलाबाई खन्सरे, निंबोळेताई, मंगलाताई चांदोरे, सौ.अनिता चंचरे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.