Breaking News

राजकीय भागीदारीसाठी वंचित माळी समाजाची एल्गार परिषद शेगावात अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभणार,- अ‍ॅड.महाडोळेबुलडाणा, (प्रतिनिधी):  महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला माळी समाज राजकीय भागीदारीपासून लोकसभा व विधानसभा जागा वाटपात वंचित असल्याने माळी समाजाची वंचित माळी एल्गार परिषद राजकीय पक्षावर दबाव आणण्यासाठी शेगांव येथे 28 डिसेंबरला होणार असून भारिप बमसंचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी 5 डिसेंबर रोजी विश्राम भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अभा माळी विदर्भ संघटक तथा अमरावती जिल्हाध्यक्ष प्रविण पेटकर, अकोला जिल्हाध्यक्ष सुभाष सानप, भारिप बमसंचे आमदार बळीराम शिरस्कार, सदानंद माळी, विष्णू उबाळे, श्रीकृष्ण उबाळे, दत्ता खरात, मुमताज खान उपस्थित होते. अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी सांगितले, राज्यात 25 विधानसभा मतदार संघ तसेच 4 लोकसभा मतदार क्षेत्र (चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा) या क्षेत्रात माळी समाजाचे सर्वाधिक लोकसंख्या व मतदार आहे.

असे असतांना विदर्भात केवळ भारिप बमसंचे एकमेव आमदार माळी समाजाचे बळीराम शिरस्कार आहेत. लोकसंख्येच्या आधारावर माळी समाजाला राजकीय भागीदारीत प्रतिनिधीत्व देणारे पक्षासोबत माळी समाज राजकीय न्याय हक्कासाठी एकत्र येणार आहे. येत्या 28 डिसेंबरला शेगांव येथे वंचित माळी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व पक्ष संघटना मधील माळी समाज एकत्र येवून माळी समाजासोबत वंचित बहुजन आघाडीतील धनगर व इतर समाजाला सुद्धा लोकसंख्येनुसार राजकीय भागीदारी असावी यासाठी राजकीय पक्षावर समाजाचा दबाव गट निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 एखादा पक्ष माळी समाजाला मतदार संघात प्रतिनिधीत्व देत असेल तर दुसरा पक्षाचा माळी समाजाचा उमेदवार उभा राहु नये यासाठी माळी महासंघाच्या मार्फत प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले. एका प्रश्‍नाच्या उत्तरात आ. बळीराम शिरस्कार यांनी भारिप बमसंच स्वबळावर लढणार किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार हा निर्णय पक्ष पातळीवर अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर घेतील अद्याप लोकसभेच्या 12 जागा साठी काँग्रेस पक्षाकडून होकार आला नाही. असे सांगून त्यांनी शेगांवची परिषद ही समाजाची आहे. कोणत्याही एका पक्षाची नाही. भारिप बमसं महासंघाच्या सोबत आहे. इतर पक्षसंघटनेतील माळी समाजाने एकत्र यावे हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.