Breaking News

खटाव तालुक्यात बालविवाहविरोधी पंधरवड्यास प्रारंभखटाव, (प्रतिनिधी) : जागतिक महिला हिंसाचार विरोधी पंधरवड्याचे औचित्य साधून निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे खटाव तालुक्यात बालविवाह विरोधी अभियान राबविले जात आहे. त्यानिमित्त शाळा, महाविद्यालयांत जनजागृतीसह गावोगावी रॅली, पथनाट्याद्वारे प्रबोधन केले जात आहे.

बालविवाह प्रतिबंधक कृती समितीच्या माध्यमातून ही संस्था सध्या खटाव तालुक्यात काम करत आहे. बालविवाहविरोधी अभियानाअंतर्गत भटजी, बँडवाले, प्रिंटींग प्रेस, मंडप आणि केटरिंग, मंगल कार्यालये, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना बरोबर घेऊन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये बालविवाह प्रतिबंधक लघूपट दाखवले जात आहेत. संस्थेच्या पूनम जगदाळे, मोनाली तांबोळी, अपर्णा ताटे आणि रितेश व रवी पवार हे सदस्य प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करत आहेत. मोळ, डिस्कळ येथील शाळांमध्ये जनजागृती करण्यात आली. गुरुवारी बुध, निढळ आणि वडूज, शुक्रवारी खटाव तर शनिवारी पुसेगाव येथे जनजागृती आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडणार आहेत.