Breaking News

लक्झरी एजंटसह बसमालकांकडून प्रवाशांची लुट


पाटण (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची एसटी बस सेवेपेक्षा खाजगी लक्झरी बसेसला अधिक पसंती असते. मात्र, ऐन सणासुदीच्या दिवसात व सुटीच्या काळात खाजगी लक्झरी बुकींग एजंट व बसमालकांच्याकडून प्रवाशांची अक्षरश: लुट होताना दिसत आहे. या मनमानी भाव आकारणला आळा घालण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. पाटण तालुक्यातील मोरगिरी, पाटण, नवारस्ता, मल्हारपेठ, ढेबेवाडी भागातील वाडयावस्तीवरील हजारो लोक मुंबईला रोजीरोटीसाठी स्थायिक झाले आहेत. ग्रामीण भागात रोजगार नसल्यामुळे अनेकांनी पुणे, मुंबईची वाट धरली आहे. अनेकजण गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईला जाण्यासाठी एसटी बस, तसेच कराड-उंब्रजला जावून तेथून महामार्गावरून ट्रकने प्रवास करताना दिसत होते. मात्र गेल्या 10 वर्षांपासून आरामशीर लक्झरी बसमधून प्रवासाकडे लोकांचा कल वाढला आहे. 

एसटी सेवेपेक्षा जलद व कमी खर्चात आरामदायी प्रवास होत असल्याने एसटी सेवेला बगल देत प्रवाशांनी खाजगी लक्झरी बस सेवेला प्रधान्य दिल्याचे दिसून येत आहे. पाटण तालुक्यातून दररोज हजारो प्रवाशी रोजी रोटीसाठी मुंबईला येतात व जातात. दररोज तालुक्यातून अंदाजे 20 ते 25 खाजगी लक्झरी बसेस मुंबईला रात्रीच्या वेळेत जातात. नियमित खाजगी लक्झरी बसला प्रवाशांना नेहमीचा दर 350 ते 400 रूपये असतो. मात्र सुट्टी व इतर सणासुदीसह लग्नसराईच्या दिवसात खाजगी लक्झरीचालकांकडून मात्र प्रवाशांची अक्षरश: लुट होताना दिसते. या वर योग्य नियंत्रण आणण्यात यावे, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.