Breaking News

किल्ले प्रतापगडावर प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशिनचे उद्घाटन


प्रतापगड,  (प्रतिनिधी) : किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळ्याचे औचित्य साधून वन विभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समिती प्रतापगड यांच्या वतीने किल्ल्यावरील प्लस्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक बाँटल क्रशर माशिनाचा प्रारंभ जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ले प्रतापगड महाबळेश्‍वरपासून अगदी लगतच असल्याने प्रतापगडास भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या नेहमीच मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या लाखोंमध्ये असल्यामुळे पर्यटकांमुळे झालेल्या प्लास्टिकचर्‍याचे प्रमाण खूप जास्त आहे. प्लास्टिकच्या कचर्‍याच्या विघटनाचा प्रश्‍न चिंताजनक असून किल्ले प्रतापगडचा परिसर तसेच प्रतापगडाच्या आजूबाजूचे जंगल प्लास्टिक कचर्‍याच्या प्रदूषणाने व्यापलेले आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम करत असते. प्लास्टिक बाँटल क्रशर मशिनमुळे काहीअंशी प्लास्टिक कचर्‍याच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येणे शक्य झाले आहे. यावेळी उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, महाबळेश्‍वरचे वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, वाईच्या उपविभागीय दंडाधिकारी संगिता राजापुरकर (चौगुले), तहसिलदार मीनल कळसकर, महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, महाबळेश्‍वर पालिकेच्या मुख्याधिकारी सौ. अमिता दगडे, प्रभारी नायब तहसीलदार श्रीकांत तिडके, प्रतापगड संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.