Breaking News

मनुवादी’ रामाने ‘दलित’ हनुमानला गुलाम बनवलेनवीदिल्लीः आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणार्‍या उत्तर प्रदेशमधील भाजपच्या लोकसभेच्या सदस्य सावित्रीबाई फुले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भगवान हनुमान मनुवादी लोकांचे गुलाम होते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी भगवान राममध्ये जर शक्ती असती, तर अयोध्येत तेव्हाच मंदिर उभारले असले, असेही म्हणत त्यांनी रामाच्या दैवीशक्तीबाबत प्रश्‍न उपस्थित केला आहे. भाजप, संघ परिवाराला हा घरचा आहेर आहे.


राम हे मनुवादी आणि हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते. जर ते दलित नव्हते, तर त्यांना मनुष्य का बनवले नाही ? त्यांना वानरच का बनवले ? त्यांचा चेहरा काळा का ठेवला.? असे प्रश्‍न फुले यांनी उपस्थित केले आणि त्याची उत्तरेही त्यांनीच दिली. हनुमान दलित होते, म्हणूनच त्यांना असे केल्याचे सावित्रीबाईंचे म्हटले आहे.


दलित आणि मागासांना वानर आणि रक्षक म्हटले जाते. हनुमान एक मनुष्य होते; पण त्यांना वानर बनवण्यात आले. हे सर्व भगवान रामांनी केले. हनुमान दलित होते, म्हणून त्यांना अपमानित करण्यात आले होते, असा दावा करत दलितांना मनुष्य समजले जात नव्हते, असे त्या म्हणाल्या.


दरम्यान, भाजप प्रवक्ते चंद्रमोहन यांनी मात्र सावित्रीबाई फुले यांना चांगलेच फटकारले आहे. खासदारांना भारतीय परंपरेचे ज्ञान दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. हनुमान दलित आहेत, असा दावा करणार्‍या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाला आहे. हनुमान दलित आहेत, ते आदिवासी आहेत, असा दावा केला जात होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी हनुमान आर्य आहेत, असा दावा करण्यात आला होता, तर एका जैन मुनींनी हनुमानाला दलित ठरवले होते. देवांचे जाती-जातीत विभाजन करू नका, असा सूर ऐकू येत असतानाच भाजप आणि संघ परिवारातच हनुमानाच्या जातीवरून वाद निर्माण झाला आहे.