Breaking News

संगमनेरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम सुरू; मुख्याधिकारी नायर यांची पोलिस बंदोबस्तात कारवाई


संगमनेर/प्रतिनिधी 
प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून आलेले प्राजीत नायर यांनी शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवत शहरातील मुख्य रस्ते व चौक अतिक्रमणमुक्त केले. आयएएस असलेले नायर यांच्या धाडसी मोहिमेमुळे पुन्हा एकदा संगमनेरकरांना प्रविण गेडाम यांची आठवण झाली.

ऐन दिवाळीच्या आगोदर नगरपालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात शहरातील अतिक्रमण हटविले होते. मात्र अवघ्या काही दिवसातच पुन्हा शहरात जैसे थे परिस्थिती निर्माण झाली. त्यातच पालिकेत आयएएस अधिकारी असलेले प्राजीत नायर हे प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून एक महिन्यांसाठी शहरात दाखल झाले. त्यामुळे शहरात केंव्हाही अतिक्रमण हटाव मोहिम राबविली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. येथील अतिक्रमणे काढल्याने शहराचा मानबिंदू असलेल्या अशोकस्तंभाने पुन्हा एकदा मोकळा श्‍वास घेतला. त्यानंतर या पथकाने सय्यद बाबा चौक येथील अतिक्रमण हटवत तेथील दर्गा मोकळी केली. त्यानंतर पुणे रोडवरील जोर्वे नाका परिसरातील सर्व अतिक्रमणे या पथकाने जमीनदोस्त केली. शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण मोहिम सुरू झाल्याने धास्तावलेल्या नवीन नगर रोड वरील टपरी व हातगाडी चालकांनी तेथून धूम ठोकली. त्याचबरोबर बसस्थानक परिसरातील फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने मागे घेत व दुकानासमोरील छत काढून घेतल्याने बसस्थानक परिसरानेही मोकळा श्‍वास घेतला. 

या कारवाईत नायर नगरपालिकेचे सर्व अधिकारी, त्याच बरोबर पोलिस निरीक्षक अभय परमार व त्यांचा फौज फाटा तैणात होता. या अतिक्रमण मोहिमेमुळे शहरातील गर्दीचे रस्त्याने काही कालावधीसाठी तरी मोकळा श्‍वास घेतला आहे.