Breaking News

लावणी महोत्सवास मल्हारपेठमध्ये उत्सफूर्त दाद


पाटण (प्रतिनिधी) : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मल्हारपेठ येथे आयोजित लावणी महोत्सवात लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर यांच्या बहारदार अदाकारीला उपस्थितांनी उत्सफूर्त दाद दिली.

मल्हारपेठ येथील बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव शेडगे, संचालक आनंदराव पवार, संजय चव्हाण, आप्पासाहेब पानस्कर, सुरेश पाटील, राजेंद्र कदम, अविनाश पाटील, आबासाहेब वाघ, सरचिटणीस अमोल माने, मल्हारपेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच नीलेश चव्हाण, सदस्य नवनाथ चिंचकर, अवधूत कांबळे, सुषमा चव्हाण, ज्योती पवार, भाग्यश्री हिरवे, संगीता वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विक्रमसिंह पाटणकर अमृतमहोत्सवी वाढदिवस समितीतर्फे केक कापून आतषबाजीही करण्यात आली.

लावणी महोत्सव पाहण्यासाठी तालुक्यातून हजारो प्रेक्षक उत्सफूर्तपणे उपस्थित राहिले होते. लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर यांच्या बुगडी शोधायला डोकं या लावणीने बहारदार सुरुवात झाली. यावेळी छत्तीस नखरेवाली, लिंबोनिचे लिंबू, तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय, लैला हूं लैला, खंडेराया झाली माझी दैना, दीलबर दीलबर, आला बाबूराव.., सोडा सोडा राया नाद खुळा अशा अनेक बहारदार लावण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकरसह साक्षी पुणेकर, अक्षदा मुंबईकर, प्राची मुंबईकर, अर्चना जावळेकर, संगीता लाखे यांनी सादर केलेल्या बहारदार लावणींच्या अदाकारीने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अमर वाघमारे यांनी गायलेल्या राष्ट्रवादी आहे कर्तव्यदक्ष, नाही कुणाच्या धाकात, विक्रमदादा किती शोभून दिसतात एक लाखात या गाण्याने उपस्थित युवक बेभान होऊन नाचू लागले. ग्रामपंचायत मल्हारपेठ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित या कार्यक्रमास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.