Breaking News

सामुहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणीला सुरूवात
परळी, (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी सर्वसामान्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाची चिंता दुर करण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठाण यांच्या वतीने २३ जानेवारीला सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे वधु-वर पित्यांना मोठा आधार मिळेल परळी व अंबाजोगाई येथे नोंदणीला प्रारंभ झाला आहे.

यंदा पावसाने दडी मारल्याने खरीप व रब्बीची पिके हातची गेली आहेत. पाण्याचे ही मोठे संकट आहे. त्याच बरोबर हाताला काम नसल्याने पैशाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशा भयावह दुष्काळाच्या परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांना आपल्या मुला-मुलींचे विवाह कसे करावे हा प्रश्न सतत भेडसावत आहे. मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांची ही चिंता दुर करून बिकट परिस्थितीत त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. पुढील महिन्यात २३ जानेवारीला होणार्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून त्यांना हा आधार मिळणार आहे. सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्यासाठी विवाहेच्छुक वधु-वरांना किंवा त्यांच्या पालकांना पाच डिसेंबर २०१८ ते ५ जानेवारी २०१९ दरम्यान नाव नोंदणी करता येणार आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील अरूणोदय मार्केट भागातील कार्यालयात व अंबाजोगाई येथील डॉ.आंबेडकर चौक येथील संपर्क कार्यालयात ही नोंदणी सुरू असणार आहे. विवाहाची नोंदणी पुर्ण पणे मोफत असून त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. नोंदणीसाठी जन्माचा दाखला, आधार कार्ड, वधु-वरांचे पासपोर्ट आकाराचे प्रत्येकी दोन फोटो सोबत आणावेत या उपक्रमात जास्तीतजास्त पालकांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.