Breaking News

फाईट सिनेमा सातार्‍याचीच कलाकृती : मोरे


सातारा, (प्रतिनिधी) : फाईट सिनेमा सातार्‍याच्याच मातीतील एक सकस कलाकृती असून सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍याच्या मुलाची बॉक्सिंग रिंगमधील धडाकेबाज कामगिरी. त्याला पैसा, अभिमान आणि पेे्रमाची मिळालेली जोड मिळाल्यानंतर काय घडते हे या चित्रपटात दाखवण्यात आले असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मूळ सातारकर असलेले जिमी मोरे यांनी सांगितले. यावेळी चित्रपटाचा नायक आणि मूळ सातारकर असलेले जीत मोरे, नायिका सायली जोशी, खलनायक प्रसाद सुर्वे, निर्माते ललित ओसवाल यांची उपस्थिती होती. 

अधिक माहिती देताना दिग्दर्शक जिमी मोरे म्हणाले, या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील केंजळ, वाई, मेणवली या परिसरात करण्यात आले आहे. चित्रपटातील भाषाही सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची नायिका सायली जोशी हिला खास सातारी मराठी शिकण्यासाठी काही दिवस सातार्‍यात पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रपटात केवळ दोनच गाणी असली तरी ती चित्रपटाच्या कथानकाला कुठेही रेंगाळत ठेवत नाहीत तर प्रवाही करतात. या चित्रपटासाठी नायक जीत मोरे यांनीही खूप कष्ट घेतले असले असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध बॉक्सर मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काहीकाळ प्रशिक्षण घेतले आहे. 

तसेच चित्रपटाची नायिका ही सातारा भागातील असल्याने मूळची नाशिकची असलेली सायली जोशी हिला सातार्‍यात काही काळ वास्तव्यास पाठवले होते. चित्रपटाचा नायकही सातार्‍याचाच गोडोली येथील असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटात मराठी सिनेमातील प्रसिद्ध कलाकार माधव अभ्यंकर, सुरेश विश्‍वकर्मा यांच्यासह लागीर झालं जी या मालिकेतील जीजी व जयडी यांच्याही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितलेयेत्या 20 तारखेला हा सिनेमा महाराष्ट्रात 400 चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून या चित्रपटाला सातारकरांनी भरुभरुन प्रतिसाद द्यावा अशी विनंतीही केली. चित्रपटाचा नायक जीत मोरे म्हणाला, हा माझा पहिलाच चित्रपट असून बॉक्सिंग या खेळाचा प्रसार व्हावा अशी यापाठीमागील भावना आहे.

 बॉक्सिंगचे काही डावपेच शिकण्यासाठी मी मनोज पिंगळे यांची मदत घेतली आहे. चित्रपटाची पार्श्‍वभूमी ही सातारा जिल्ह्यातील असल्याने बहुतांशी चित्रीकरण सातारा जिल्ह्यात केले आहे. अ‍ॅक्शन दृश्ये हिंदी चित्रपटाची तोडीची झाली असून यासाठी कोणाताही डमी वापरलेला नाही. तसेच यातील फाईट ही सिनेमातील न वाटता वास्तवातील वाटेल अशा पद्धतीने चित्रीकरण केल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रपटाची नायिका सायली जोशी म्हणाली, या चित्रपटातील नायिका ही सातारा भागातील असल्याने मी काही काळ सातार्‍यात राहून येथील तरुणींच्या बोलीभाषेचा अभ्यास केला. चित्रपटासाठी टीमनेच खूप परिश्रम घेतले असल्याचे जोशी हिने सांगितले.