Breaking News

सिध्दगिरी कण्हेरी मठावर मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबिरसातारा, दि. 7 (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कण्हेरीतील सिद्धगिरी मठ कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने दि. 14 ते 16 डिसेंबर दरम्यान मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ सातारा जिल्ह्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. रेशम रजपूत, डॉ. अरुणा बर्गे यांनी पत्रकार परिषदेत केले. 

या शिबिराबाबत अधिक माहिती देताना डॉ. सौ. रजपूत म्हणाल्या, आज आरोग्याच्या दृष्टीने कर्करोग ही जागतिक समस्या बनली आहे. प्रामुख्याने तंबाखू सेवन, मद्य, अतिमेद व मसालेदार पदार्थांचे सेवन, निरनिराळी औद्योगिक रसायने, विषारी आहार व बिघडलेली आहारशैली ही कर्करोगाची मूळ कारणे आहेत. अत्यंत माफक दरात उत्कृष्ट व अत्याधुनिक सेवा देणार्‍या सिद्धगिरी हॉस्पिटलने गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत अनेक मोठमोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही केल्या आहेत.

 सिद्धगिरी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने दि. 14 ते 16 डिसेंबर दरम्यान मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात नावनोंदणी करण्यासाठी दि. 10 डिसेंबर पर्यंत मुदत असून नोंदणी व अधिक माहितीसाठी डॉ. रेशम रजपूत, डॉ. प्रमोद घाटगे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सिद्धगिरी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने दि. 14 ते 16 डिसेंबर दरम्यान होणार्‍या या शिबिरासाठी 4 सुसज्ज ऑपरेशन थिएटससह डॉक्टरांच्या चार टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत. या शिबिरात अहमदाबाद, बंगळूर, हैद्राबाद, मुंबई, पुणे येथील राष्ट्रीय स्तरावरील कॅन्सरतज्ज्ञांमार्फत उपचार होणार असून हे उपचार पूर्णपणे मोफत आहेत. 

याशिवाय सिध्दगिरी हॉस्पिटल येथे सवलतीच्या दरात मेंदू, सामान्य उपचार, अस्थिरोग, प्लॅस्टिक सर्जरी, किडनी विकार, स्त्रीरोगव प्रसुती, बालरोग चिकित्सा, दंत चिकित्सा, कान, नाक, घसा चिकित्सा, नेत्रचिकित्सा, त्वचारोग चिकित्सा, मानसोपचार या सुविधा उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गणपत कासुर्डे यांनी सूत्रसंचालन केले.