Breaking News

कर्मवीरांचा वारसा पुढे सुरु ठेवणार : रामशेठ ठाकूर; इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्काराने रामशेठ ठाकूर सन्मानीत


सातारा (प्रतिनिधी) - कर्मवीर अण्णांनी जीवनभर जोपासलेला त्यांचा वारसा यापुढील आयुष्यात सुरु ठेवणार असे भावोद्गार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी काढले. येथील रयत शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणारा इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार प्रदानप्रसंगी ते सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, सौ. सरोजताई पाटील, डॉ. राजेंद्र जगदाळे, व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांच्यासह रामशेठ ठाकूर यांचे पुत्र आमदार परेश ठाकूर, प्रशांत ठाकूर, स्नुषा अर्चना ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले, आतापर्यंतच्या जीवनात अनेक पुरस्कार मिळाले मात्र, रयत शिक्षण संस्थेने दिलेला सौ. लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार आणि आज मिळालेला इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार हे माझ्या दृष्टीने सर्वात मोठे पुरस्कार आहेत. ज्यांच्या नावाने आणि ज्या संस्थेने हा पुरस्कार दिला आहे तो फार मोठा सन्मान आहे. मी ज्यावेळी खासदार झालो त्यावेळी लोकांनाच माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला होता. त्या आनंदापेक्षाही हा आनंद अत्यंत मोठा असल्याचे नमूद करत रामशेठ ठाकूर यांनी रयतमुळे मी घडलो असे प्रांजळपणे कबूल केले. आपले गुरु डॉ. एन. डी. पाटील यांचाही अत्यंत कृतज्ञतेने उल्लेख करत ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी जरी भाजपाचा खासदार म्हणून काम केले असले माझा मुलगा परेश भाजपामध्ये असला तरी मी आजही 50 टक्के काम हे फक्त रयतसाठीच करतो. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे जरी राष्ट्रवादीत असले तरी रयतमध्ये राजकारण आणत नाहीत त्याप्रमाणेच मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. यापुढील आयुष्यातही कर्मवीर अण्णांचा वसा आणि वारसा असाच पुढे सुरु ठेवणार, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पुरस्काराची 25 हजाराची रक्कमही त्यांनी संस्थेकडे सुपूर्त केली. याशिवाय 70 लाखाची देणगीही रयत दिली. प्रास्ताविकात भाऊसाहेब कराळे यांनी इस्माईलसाहेब मुल्ला यांनी आयुष्यभर विनावेतन रयत शिक्षण संस्थेची जी सेवा केली त्यास तोड नाही, त्यांनी संस्थेचे मानद सचिवपद तहहयात भूषविले त्यांचे काम रयतच्या इतिहासात नोंद करण्यासारखे आहे. पुरस्काराचे मानकरी रामशेठ ठाकूर यांचे कार्यही अन्यनसाधारण आहे. त्यांनी कमवा आणि शिका योजनेला एक वेगळी दिली. रयत शिक्षण संस्थेला त्यांनी आतापर्यंत कोट्यवधीची देणगी दिली आहे. रामशेठ ठाकूर यांना दिलेल्या पुरस्काराने आमचाही सन्मान झाला आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
संस्थेचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. दिलावर मुल्ला यांनी भावना व्यक्त करताना इस्माईलसाहेब आणि अण्णा व रयत शिक्षण संस्थेशी असलेले आपले नाते विषद केले. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या हस्ते रामशेठ ठाकूर यांचा रयत महावस्त्र, शाल, बुके, मानपत्र व मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. सरोजताई पाटील यांच्या हस्ते सौ. वर्षाताई ठाकूर यांचा शाल, श्रीफळ, बुके, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सौ. सुजाता पवार यांनी केले. कार्यक्रमास सातारा, रायगड जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, रायगड व सातारा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इस्माईलसाहेब मुल्ला यांची नात सारा मुल्ला हिने इंग्रजीतून आपल्या पणजोबांविषयीच्या भावना व्यक्त केल्या.