Breaking News

शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण आणि धर्मांधिकरण बंद करा; एसएफआयच्या अधिवेशनातील सुर


बीड, (प्रतिनिधी):-स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) चे ४० वे बीड जिल्हा अधिवेशन आज शहरातील स्काऊट गाईड भवन येथे पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन ‘एसएफआय’चे राष्ट्रीय महासचिव मयुख बिस्वास यांनी केले. तसेच संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य सरचिटणीस बालाजी कलेटवाड, राज्याध्यक्ष मोहन जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तर शिक्षक नेते पी.एस.घाडगे आणि शेतकरी नेते कॉ.उत्तम माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘एसएफआय’चा झेंडा फडकावून आणि शहीद भगतसिंग, शहीद अभिमन्यू यांना अभिवादन करून अधिवेशनास सुरुवात झाली. त्यानंतर सभागृहात शोक प्रस्ताव मांडून शहिदांना आदरांजली व्यक्त केली गेली. उद्घाटन सत्रात मान्यवरांनी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. शैक्षणिक, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत अनेक वक्त्यांनी शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण आणि धर्मांधिकरण बंद करा अशी एकमुखी मागणी केली.

प्रतिनिधी सत्रात ‘एसएफआय’ने मागील वर्षभर जिल्हाभरात केलेले कार्य, जिल्ह्यातील व राज्यातील शैक्षणिक परिस्थिती, संघटनात्मक परिस्थती यावर एक अहवाल मांडला. या रिपोर्टमध्ये भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान, सक्तीचे, मोफत, गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे. सार्वत्रिक शिक्षण व्यवस्था बळकट झाली पाहिजे. या मागणीसाठी आजपर्यंत ‘एसएफआय’ ने संघर्ष केलेला आहे. शुल्क वाढीच्या विरोधात, शिष्यवृत्ती, ईबीसी, शासकीय वसतिगृहे यांचे प्रश्न ‘एसएफआय’ ने सातत्याने मांडण्याचे काम केले आहे.