Breaking News

राफेल प्रकरणी राहुल गांधी खोटे बोलत आहेत; प्रदेश प्रवक्त्या श्‍वेता शालिनी यांचा आरोप


सातारा (प्रतिनिधी) : राफेलप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पूर्णपणे खोटे बोलत असल्याचा भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्या श्‍वेता शालिनी यांनी रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे महान कर्मयोगी तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संत असल्याचेही नमूद करत काँग्रेसवर सडकून टिका केली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, नगरसेवक धनंजय जांभळे, मिलींद काकडे, सौ. आशा पंडित, रवींद्र पवार आदी पदाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांसह राफेल विमान खरेदी प्रकरणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, फ्रान्समधील डेसो ही कंपनी राफेल हे अत्याधुनिक विमान तयार करते. कारगील मोहिम जिंकताना भारताचे अनेक हरहुन्नरी आणि सळसळत्या रक्ताचे लेफ्टनंट, कॅप्टन आपण गमावले आहेत. आपल्याकडे कमी उंचीवरुन मारा करणारे विमान नसल्याने आपले हे जवान शहिद झाल्याचेही त्यांनी नमूद केले. हे विमान खरेदी करताना आमच्या सरकारने कोणताही मध्यस्थ ठेवलेला नाही. 

थेट फ्रान्स सरकार ते भारत सरकार असा हा व्यवहार असल्याने यामध्ये कोठेही आणि कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. काँगे्रसने केलेल्या जेपीसीची मागणी का मान्य केली जात नाही, या प्रश्‍नावर त्यांनी विमान खरेदी करणे आता देशासाठी महत्वाचा प्रश्‍न बनला आहे. जेसीपी आल्यास ही सर्व प्रक्रिया लांबणार आहे. त्यामुळे सर्वांला विलंब होणार असल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहोत असा खुलासाही त्यांनी केला. बोफार्सप्रकरणी काय झाले. आता मिशेलनेही सोनिया गांधी यांचे नाव घेवून तसा आरोप केला आहे. काँग्रेस हे धुतल्या तांदळासारखे नाही. राहुल गांधी यांचे सर्व आरोप खोटे असून काँग्रेसने आतापर्यंत खोटे बोलून सत्ता मिळवली आणि सध्याही ते खोटेच बोलत असयाचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय कामसू आणि देशाला वाहून घेतलेले पंतप्रधान असून त्यांनी आतापर्यंत एकदाही सुटी घेतलेली नाही असे त्यांनी सांगितले यावर ते परदेशात जातात तेव्हा त्यांच्यासोबत येथील कामाच्या फाईल असतात का? असा प्रश्‍न पत्रकारांनी केला यावर त्यांनी आक्रमक होत त्यांच्या दौर्‍यांमुळे एक फाईल अडली आहे, अगर कोणाचे काम अडले आहे, कोणता प्रश्‍न सुटला नाही याचे एक उदाहरण दाखवा असा पवित्रा घेतला. त्यानंतर भारत देश भविष्यातील विश्‍वगुरु असेल असे विधान करत मोदी हे जागतिक दौरे करत असल्यानेच भारताचा जगात मान वाढला आहे. अनेक देशातील मोठ्या कंपन्यांचे सीईओ हे भारतीय आहेत. अनेक कंपन्या भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत हे सर्व मोदी यांचेच यश असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत अशी स्तुतीसुमने उधळत त्यांनी ते कोणालाही घाबरत नसल्याचे सांगत फडणवीस यांनी महाराष्ट्रात मोठ मोठ्या योजना तळागाळात पोहोचवल्या असल्याचेही नमूद केले. शिवसेना आणि आम्ही एका विचारधारेचे आहोत हिंदुत्ववादी आहोत त्यामुळे आगामी काळात येणार्‍या 2019 च्या निवडणुकीत आम्ही एकत्रच असणार आहोत असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मोदी यांनी प्रत्येक भारतीयांच्या खात्यात 15 लाख जमा होतील असे आश्‍वासन दिले होते त्याचे काय झाले. या प्रश्‍नावरही आक्रमक झालेल्या श्‍वेता शालिनी यांनी हा खोटा आरोप असून मोदी असे कधीही, कुठेही बोलले नव्हते असा खुलासा करत जर ते असे बोलले असतील तर तसा एखादा व्हिडीओ मला दाखवा असा आग्रहच पत्रकारांसमोर केला. राफेल हे प्रकरण सातारा जिल्ह्यात येवून सांगण्याचे कारण म्हणजे सातारा जिल्हयात सैन्यदलात भरती होणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. आणि आपल्या देशासाठी बलिदान देणार्‍यांमध्येही सातारा जिल्हा अगे्रसर असल्याचे त्यांनी सांगितले. अमित शहा हे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि मोदींप्रमाणेच ते पक्षासाठी न थकता अखंडपणे काम करत आहेत असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. पाच राज्यातील निकालावरुन भाजप बँकफूट गेले आहे का? या प्रश्‍नावर त्यांनी आम्ही पराभवाला कधी भीत नाही. जर आम्ही हरलो असलो तरी आमच्या मतदानाच्या टक्केवारी मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हारला असलो तरी आम्हीच जिंकलो आहोत असे त्यांनी ठासून सांगितले. 2019 मध्येही नरेंद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान असतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.