Breaking News

जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग मतदार जनजागृती रॅली जिल्हाधिकारी यांनी केले अपंग बांधवांचे सारथ्य


बुलडाणा,(प्रतिनिधी): निवडणुकीमध्ये अपंग घटकांना समावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने सुलभ निवडणूका हे घोषवाक्य जाहीर केले असून अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अपंग मतदारांमध्ये लोकशाही प्रकियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावी.

 या हेतूने आज अपंग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाच्या धर्तीवर अपंग बांधवांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी गांधी भवन, जयस्तंभ चौक येथून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अपंग मतदारांची रॅली काढण्यात आली. सदरील रॅलीमध्ये अपंग मतदार मोठ्या उत्साहाने व मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीत जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे, जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी षन्मुखराजन यांनी अपंग बांधवांच्या तीन चाकी सायकलींचे सारथ्य केले. या कार्यक्रमाच्या अधिक प्रभावी जनजागृतीसाठी कलापथकाचे आयोजन देखील करण्यात आले.   

 यावेळी जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी वराडे, अपंग विदयालयचे शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी प्र.के.दुबे, राजेंद्र देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, तहसीलदार सुरेश बगळे, सहाय्यक आयुक्त मनोज मेरत, नेहरु युवा केंद्राचे सोहेल अहेमद, अपंग निवासी विद्यालयाचे शिक्षक रमेश आराख आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे ठिकाणी दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या पत्रिकेचे व बॅचेसचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार के.व्ही.पाटील, अव्वल कारकून एन.एस.बढे, अनंत साळवे, विजय सनिसे, नाना कुलकर्णी व व्हि.एम. तायडे यांनी प्रयत्न केले.