Breaking News

तडीपार तिघे आढळले शहरातचनगर । प्रतिनिधी -
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकार्‍यांनी नगर शहरातून तडीपार केलेले आणखी तिघेजण नगर शहराच्या हद्दीतच आढळून आले आहेत. तसेच अटी व शर्तीवर नगर शहरात राहण्यास परवानगी दिलेल्या दोघांनी या अटी व शर्तींचा भंग केल्याने त्यांच्यावर कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये भादंविक 188 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिवाजी अशोक कदम (वय 30, रा. माळीवाडा), सुनील गोपाल वर्मा (वय 25, रा. सातपुते गल्ली, केडगाव) यांनी अटी व शर्तींचा भंग केला. तर ओंकार रमेश घोलप (वय 20, रा. माणिकचौक), विशाल सूर्यकांत यादव (वय 38, रा. पंचवटी कॉलनी, भिस्तबाग चौक), राकेश विठ्ठल वैरागर (वय 26, रा. शांतीपूर, तारकपूर) हे तडीपार करुनही नगर शहरातच आढळून आले आहेत.

नगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिसांनी काही गुंडांचे तडीपारीचे प्रस्ताव पाठविले होते. त्यातील अनेकांना प्रांताधिकार्‍यांनी 10 डिसेंबरपर्यंत तडीपार केले आहे. मात्र हे तडीपार केलेले गुंड नगर शहरात वावरताना आढळून येत आहेत. तसेच काहीजणांना अटी व शर्तीवर नगर शहरात वास्तव करण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून अटी व शर्ती पाळल्या जात नसल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले असून त्यांच्याविरुध्द पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.