Breaking News

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यात स्वाभिमान सप्ताह


सातारा, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व माजी केंद्रिय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पाटीतर्फे ‘चला देवूया मदतीचा हात’ असा आशय असलेला स्वाभिमान सप्ताह दि. 10 ते 16 डिसेंबर या कालावधीत आयोजित करीत आहे. या उपक्रमाद्वारे लोकांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्याचे नियोजन असल्याची माहिती पक्षाचे जिल्ह्याचे प्रभारी आ. शशिकांत शिंदे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिली.


स्वाभिमान सप्ताहानमित्ताने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच पदाधिकारी व कार्यकर्ते पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या ठिकाणी टँकर उपलब्ध करून देणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील बसथांब्यांवर पाणपोई व उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी नियोजन परिषद, गरजू शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, गरीब शेतकर्‍यांच्या मुलांना शैक्षणिक व क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, आरोग्य व रक्तदान शिबिरे घेणे, विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या युवक युवतींचा गौरवही करण्यात येणार आहे. या बरोबरच ‘असा असावा महाराष्ट्र माझा’ या विषयावर विद्यालय, महाविद्यालये स्तरावर निबंध व वक्तृत्त्व आणि वादविवाद स्पर्धा घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात दिली आहे.