Breaking News

महात्मा गांधींचे विचार कधीच मरणार नाहीत : चंद्रकांत वानखडे


बुलडाणा,(प्रतिनिधी): महात्मा गांधी यांच्या नावाशिवाय या देशाचा इतिहास लिहलाही जाऊ शकत नाही. महात्मा गांधींची हत्या झाली असली तरी त्यांच्या विचारांची हत्या मात्र कुणालाही करता येणार नाही. त्यामुळे गांधींचे विचार कधीच मरणार नाहीत, असे प्रतिपादन साहित्यिक, विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी येथे बोलताना केले.जिल्हा ग्रंथोत्सवात महात्मा गांधी यांच्या 150 जयंतीनिमित्त ’गांधी का मरत नाही’ या विषयावर चंद्रकांत वानखडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिपक लद्धड होते. कार्यक्रमाला सहायक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव, महाबीजचे क्षेत्रीय अधिकारी अशोकराव निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.


पुढे बोलताना चंद्रकांत वानखडे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील विविध आंदोलने, सत्याग्रहाबाबत माहिती दिली. देशातील सर्वसामान्य जनतेमध्ये स्वातंत्र्यांची ज्योत पेटविण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. महात्मा गांधी यांचे जगातील 147 देशांमध्ये पुतळे आहेत. ज्या इंग्रजांच्या विरोधात महात्मा गांधींनी लढा उभारला आणि त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले त्या इंग्रजांनीही त्यांच्या देशात महात्मा गांधी यांचा पुतळा उभारला यावरुन महात्मा गांधींचे श्रेष्ठत्व सिद्ध होते परंतु असे असले तरी महात्मा गांधींची हत्या हे या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव असल्याचे चंद्रकांत वानखडे यांनी सांगितले. यापूर्वी ग्रंथोत्सवाच्या पहिल्या सत्रात वाचन संस्कृती व आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर चर्चासत्र पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र काळे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नितीन सिरसाट, लक्ष्मीकांत बगाडे, सिद्धार्थ आराख, महेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. कितीही आधुनिक तंत्रज्ञान विकसीत झाले तरी वाचनाचे महत्व मात्र अबाधीत आहे, असे प्रतिपादन राजेंद्र काळे यांनी केले तर सोशल मीडियाच्या युगातही वाचनाची गोडी कमी न होता वाढत असल्याचे सुधीर चेके पाटील यांनी सांगितले. वाचना शिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकत नाही, असे प्रतिपादन लक्ष्मीकांत बगाडे यांनी केले तर वाचकांची रुची आधुनिकतेपेक्षा प्रत्यक्ष साहित्य वाचनाकडे असल्याचे सिद्धार्थ आराख यांनी सांगितले. नितीन सिरसाट यांनी सोशल मीडिया वाचन संस्कृती वाढविण्यासाठी लाभदायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले.