Breaking News

यंदाचा विजय दिवस मराठा लाईट इंन्फट्रीला समर्पितकराड,
विजय दिवस समारोहाचे यंदाचे 21 वे वर्ष असुन नेहमीप्रमाणेच यंदाही दिमाखात विजय दिवस समारोह साजरा केला जाणार आहे. मराठा लाईट इंन्फट्रीला यंदा 250 वर्षे होत असल्याने यंदाचा विजय दिवस मराठा लाईट इंन्फट्रीला समर्पित करण्यात आला आहे. या वर्षीही सैन्यदल जवानांच्या कसरतींसह मोटरसायकलच्या डेअरडेव्हील्सचे खास आकर्षण असणार आहे, अशी माहिती विजय दिवस समितीचे संस्थापक अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी दिली. 

विजय दिवस समारोह यंदा 14 ते 16 डिसेंबर दरम्यान होत असून त्यापार्श्‍वभुमीवर प्रशासनाच्या तयारीसंदर्भातील बैठक प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यादरम्यान ते बोलत होते. तहसीलदार राजेश चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी सौ. यु. जे. साळुंखे, नगर अभियंता एम. एच. पाटील, विस्तार अधिकारी आनंद पळसे,बांधकाम विभागाचे एस. व्ही. पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अभिजीत पाटील, तुकाराम वाघमोडे यांच्यासह विजय दिवस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले, यंदाच्या विजय दिवस समारोहात नेहमी प्रमाणेच शोभायात्रा, कर्‍हाड स्वच्छता दौड, माजी सैनिकांचा मेळावा, यशवंत जीवन गौरव पुरस्कार वितरण यासह 16 डिसेंबरला छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर मुख्य सैन्य दलाच्या कसरतींचा कार्यक्रम होणार आहे. यंदाच्या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे सैन्यदलातील जवानांचे डेअरडेव्हील्सचे पथक हे खास आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर सैन्यदलाचे श्‍वान पथक, एसआरपीएफचे पीटीची प्रात्यक्षिक, गुरखा रेजिमेंटचा कुकरी डान्स, बॉम्बे इंजिनीयरींग ग्रुपचे जिम्नॅशीयमचे प्रात्यक्षिक, पुणे येथील पॉवर मोटर ग्रुप, मराठा लाईट इंन्फंट्रीचे लेझीम व मल्लखांबांचे पथक आणि स्थानिक विद्यार्थ्यांचे समूहनृत्य सादर केले जाणार आहे. अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, विनायक विभुते यांनीही या वेळी काही समयोचित सूचना मांडल्या. 
 
400 महिलांची मोटरसायकल रॅली
यंदाच्या विजय दिवस समारोहाच्या पार्श्‍वभूमिवर नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी 16 डिसेंबरला समारोहाच्या मुख्य दिवशी 400 महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीतील महिला तिरंगी कपडे परिधान करुन रॅली काढणार असुन शहरातून त्या छत्रपती शिवाजी स्टेडीयममध्ये येणार आहेत. त्याचे नियोजन मीनल ढापरे व सहकारी करत आहेत.