Breaking News

चौकशीमुळे गांधी कुटुंबाची उडाली झोप; भाजपची टीका; ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा


नवीदिल्लीः व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिश्‍चिअन मिशेलच्या प्रत्यार्पणानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे काँग्रेसने या दलालाला वाचवण्यासाठी आपली टीम पाठवली आहे. या दलालालाच्या चौकशीमुळे आता काँग्रेसमधील एका कुटुंबाच्या रात्री झोपेविना जाणार आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. 

ख्रिश्‍चिअन मिशेलच्या प्रत्यार्पणानंतर त्याचे वकीलपत्र काँग्रेसच्या नेत्यांनी घेतले आहे. या पार्श्‍वभूमीवर पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, की काँग्रेसने मिशेलच्या बचावासाठी आपली टीम पाठवली आहे. काँग्रेस वकील नेते अल्जो जोसेफ हे मिशेलसाठी न्यायालयात हजर झाले. त्यानंतर काही वेळातच काँग्रेसने त्यांची हाकालपट्टी केली. अल्जो जोसेफ यांच्याशिवाय आणखी दोन वकीलही मिशेलच्या मदतीसाठी उभे राहिले आहेत. यांपैकी एक अ‍ॅड. विष्णू शंकर हेे केरळ काँग्रेसच्या नेत्याचे पुत्र आहेत, तर दुसरे श्रीराम परक्कट हे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे सदस्य आहेत. हे तिघेही काँग्रेसचे मोठे वकील नेते सलमान खुर्शिद आणि कपिल सिब्बल यांच्यासोबत काम करतात.

ख्रिश्‍चियन मिशेल याचे वकिलपत्र घेतल्यानंतर काँग्रेसने तातडीने अल्जो जोसेफ यांची युवक काँग्रेसमधून हकालपट्टी केली. जोसेफ हे काँग्रेसच्या कायदा विभागाचे राष्ट्रीय प्रभारी होते. जोसेफ यांनीच स्वत: प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण ख्रिश्‍चिअन मिशेलचे वकिलपत्र घेतल्याचे सांगितले होते. यासंदर्भात युवक काँग्रेसने एक परिपत्रक प्रसिद्ध केले असून यामध्ये त्यांनी वकिलपत्र घेण्याचा निर्णय जोसेफ यांचा आहे. त्यांनी यासंबंधी पक्षाशी कोणतीही चर्चा केली नसल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ पक्षातून काढण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. पक्षात अशा गोष्टींना जागा नाही, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.