Breaking News

वीज कंपनीकडून देयकापेक्षा अतिरिक्त रकमेचा भार अधिक


सातारा (प्रतिनिधी) : वीज वापराच्या देयकापेक्षा अतिरिक्त रकमेचा भार अधिक वाढत असल्याने घरगुती वीज ग्राहकांत संताप आहे. दर महिन्याला या रकमेतून लूट करण्यात येत असल्याचा आरोप ग्राहकांमधुन होत आहे. ग्रामीण भागात आता घरगुती वीज महाग करण्यात आली आहे. युनिट दरात अन्य राज्याचे तुलनेत वाढ करण्यात आली आहे. विजेचा वापर करीत असल्याने युनिट दराचे देयक देण्यात येत असले तरी, यापेक्षा अतिरिक्त दराची लूट अधिक आहे. एका घरगुती वीज ग्राहकाला युनिट दराचे 380 रूपये दराचे वीज देयक आहे. परंतु या ग्राहकाला अतिरिक्त दराची रक्कम अधिक आहे. यात स्थिर आकार 80 रूपये आहे. या आकारात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. महिन्याकाठी महावितरण कंपनीला देण्यात येणारा हा शुद्ध नफा आहे. कोट्यवधी रूपये या शुद्ध नफ्यातून गोळा करण्यात येत आहे. या ग्राहकांचे वीज देयकांत वहन आकार 145 रूपये घेण्यात आले आहे. आयात करण्यात येणारे शुल्क ग्राहकाकडून वसूल करण्यात येत आहे. 


या शिवाय इंधन समायोजन आकार 31 रूपये असून या रकमेची वसुली कळेना झाली आहे. यामुळे दर महिन्यात वसुलीचा आकडा फुगत असताना कुणी बोलत नाही. दर महिन्याला विजेचे देयक करत असताना मात्र 16 टक्के व्याज आकारले जात आहे. या ग्राहकांचे 102 रूपये वीज शुल्क अशी नोंद करण्यात आली आहे. वीज वापराचे देयक 380 रूपये असले तरी अतिरिक्त देयक 359 रूपये आहे. दर महिन्याला या अतिरिक्त देयकाचे राशीत चक्रावून सोडणारी वाढ होत आहे. परंतू पेट्रोल आणि डिझेलच्या दराप्रमाणे स्थिर आकारातही चढ उतार करण्यात येत नाही. दरम्यान, ग्रामीण भागात वाढत्या विजेच्या देयकामुळे घरगुती वीज ग्राहकाकडे थकबाकी वाढत आहे. महिनाभराची थकबाकी राहिली तरी वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली जात आहे. शासन स्तरावर ग्रामीण भागात अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे प्रयत्न करण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात भरमसाठ वीज देयकामुळे गावात आता प्रकाशकडून अंधाराकडे असे चित्र निर्माण झाले आहे. शासन स्तरावर वीज देयकांत सूट देण्याची गरज असून अन्य राज्याचे स्वस्त दरात वीज उपलब्ध करणारे धोरण राबवण्याची मागणी केली जात आहे.