Breaking News

सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर विकासापासून वंचित


शिखर शिंगणापूर- (सचिन पवार यांजकडून) - महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेल्या शंभू महादेवाचे जागृत देवस्थान असल्याने शिंगणापूरमध्ये शिवभक्ताची चैत्र ,श्रावण, कार्तिक, अधिक महिन्यात मोठी गर्दी पहावयास मिळते .

शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मराठवाडा, विर्दभ ,खानदेश कर्नाटक आंध्रप्रदेश सह इतर राज्यातून भाविकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. हजारो किलोमीटर वरून येणार्‍या भाविकांना शिंगणापूरमध्ये कोणत्याही प्रकारची नागरी सुविधा मिळत नाही .

भाविकासाठी सुसज्ज व सर्व सुखसोनियीयुक्त भक्तनिवास नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. शासनाने तीर्थक्षेत्र विकास अंर्तगत भाविकांच्या निवासाची सोय होण्यासाठी योग्य ती उपाययोजना केल्या जाव्यात.
शासन राज्यातील इतर तीर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यावधी निधी खर्ची घालत आहे. हे खर असले तरी मात्र शिखर शिंगणापूर या तीर्थक्षेत्राच्या विकासाकडे शासन दुर्लक्ष करत आहे.

तसेच शिंगणापूरमध्ये सार्वजनिक शैचालयाची युनिटे 15 हून अधिक आहेत. मात्र एकही युनिट सुस्थिती नाही व वापरातही नाही. पाण्याची सोय सुमारे शैचालयाची उभारणी झाल्यापासून दिली गेली नाही. स्वच्छ भारत मिशन ही संकल्पना केंद्र सरकार व राज्य शासन राबवित आहे. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमाद्वारे संदेश पोहचविण्यासाठी सर्व स्तरातून जनजागृती केली जात आहे.

शिंगणापूरमध्ये ठिकठिकाणी गटर योजना सुध्दा प्रभावीपणे राबवली गेली नाही. कारण गटरातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. गटारीची स्वच्छता ,दुरूस्ती व अनेक महिन्यापासून अर्धवट स्वरूपात गटारीची दयनीय अवस्था आहे. तसेच मुंगीघाटाकडे जाणार्‍या पायरी रस्ता अस्वच्छता व दुर्गंधीमय झाला असून त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्याविषयक समस्या निर्माण झाली आहे. 

शिंगणापूर बसस्थानक ते शंभू महादेव मंदिर मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरील देवस्थानच्या अन्नछत्रापासून सुरू होणार्‍या संरक्षण कठडे जागो जागी तुटलेले आहेत. शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . सदरचा रस्ता हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असून या दुरावस्थेबाबत शिंगणापूर ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. महादेवाच्या दर्शनासाठी सर्व खात्याचे अधिकारी वर्ग येऊन जातात, मात्र याबाबत त्यांना कोणतीही अडचण कदाचित वाटत नसावी. अशा प्रकारचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत या तीर्थक्षेत्राकडे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नाही हे दिसून येत आहे. 

राज्य शासनाने विविध वित्त आयोगामार्फत ग्रामपंचायतीच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याबरोबर विकास आराखडा तयार करून निधी वापरण्याचे सर्व अधिकार ग्रामपंचातीना राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र विकास हा केवळ कागदावरच राहतोय.

ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून गेलेल्या वार्ड प्रतिनिधीना कोणते विधायक काम नक्की कोणत्या योजनेतून आहे. कोणते विकासकाम करायचे आहे. त्या वार्डमधील अडचणी कोणत्या आहेत. किती निधी विकास कामासाठी उपलब्ध आहे. हे ठराविक सदस्यांना सुध्दा माहिती नसते. शासनाने गावाचा सर्वागीण विकास झपाट्याने व्हावा. या करिता ग्रामपंचातीना सर्व अधिकार देण्यात आले असूनही नागरी सुविधा पुरवण्यासाठी कमी पडत आहे. हे मात्र नक्की.

तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून कागदावरच शिखर शिंगणापूरचा उल्लेख आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी सुखसुविधाचा बोजवारा पहावयास मिळत आहे.विशेषतः महिला भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. कारण स्वच्छतागृहे सुसज्ज नाहीत. स्वच्छतागृहे केवळ शो पीस आहेत. बाकी काही नाही. पुष्कर तलावात पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. पाण्याची व्यवस्था केल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. येणार्‍या महिला भाविक भक्तांची चांगली सोय होईल.

राज्य शासनाकडून तीर्थक्षेञासाठी भरीव निधीची आवश्यकता 

राज्य शासनाकडून शिखर शिंगणापूरमध्ये येणार्‍या भाविकांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे.प्रामुख्याने पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था भक्तीनिवासाची सोय लाईट व्यवस्था आरोग्य सेवा या सुविधा भाविकांना देऊन गैरसोय दूर करून तीर्थक्षेञाचा विकास करण्यात यावा.म्हणून विशेष प्रयत्न व्हावेत. नागरी सुविधा गेली 30 वर्षापासून केवळ कागदावरच पहावयास मिळत आहे. नागरी सुविधाचा बट्याबोळ पहावयास मिळत आहे. तीर्थक्षेत्राच्या विकास कार्यक्रमात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश होऊन विकास व्हावा, याचे गणित अद्याप कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला उलगडले नाही. म्हणून शिखर शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र विकासापासून खूप दूर राहिले आहे. शिंगणापूर तीर्थक्षेत्राच्या मागील इतर नवीन तीर्थक्षेत्राचा विकास झाला. मात्र या तीर्थक्षेत्राकडे गेल्या 30 वर्षापासून राज्य शासनाचे दुर्लक्षच झाले आहे. शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात शिखर शिंगणापूरसाठी विशेष तरतुद करून अनेक वर्षे रखडलेला विकास होण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी भाविक ग्रामस्थाकडून होत आहे. एकूणच तीर्थक्षेत्राच्या मानाने कोणतीही नागरी सुविधा मिळत नाही. ती उलट अधिक गुंतागुंतीची होताना दिसत आहे. 
विकासकामाच्या नावाखाली नुसता निधी खर्ची घातला जोतोय तो ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. शासनाकडून तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, पाणलोट विकास, डोंगरी विकास, जिल्हा प्रशासन, यात्रा अनुदान, महसुलाचे मोठे गाव, विविध योजना, 13 व 14 व्या वित्त आयोग निधी जिल्हा परिषद बांधकाम विभाग अशा विविध मार्गाने गावाची विकासात्मक वाटचाल होणे. तसेच ते विकासकाम सर्वाच्या वापरात येण्याबाबत प्रयत्न केला जावा. नुसती ठेकेदार व अधिकारी वर्गाचे खिसे भरले जातात. कामाचा दर्जा कसा का असेना विकासकामाचा निधी मात्र खर्ची पडला पाहिजे. विकासकामात वापरले जाणारे घटक दर्जेदार असले पाहिजे. तरच कामाचा दर्जा व मजबुत चिरकाल टिकते. मात्र तशाप्रकारे वस्तुस्थिती पहावयास मिळत नाही. दर्जाहीन कामाकडे कोणतीही प्रशासकीय यंत्रणा कारवाई करत नसावी. कारण विकासकाम देणे व विकासकामाचे बील काढणे याशिवाय अधिकारी वर्ग काहीही बघत नाही ही वस्तुस्थिती आहे. विकासकामाकडे जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून विकासकाम कशा प्रकारचे केले जात आहे, हे पाहणे गरजेचे आहे. नाही तर आंधळ दळतयं अन् कुत्रं पीठ खातयं अशी अवस्था होईल. 

युती शासनाने धोम-बलकवडी किंवा निरा-देवधर सिंचन योजनेचे पाणी तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूरच्या पुष्कर तलावात सोडावे. पुष्कर तलाव हा उत्तर भागातील सर्वात मोठा तलाव आहे. पाणी साठवण्याची क्षमता जास्त आहे. पुष्कर तलावात पाणी सोडल्यास भाविकांची सोय होऊन या भागातील इतर गावाना यांचा नक्कीच फायदा होईल. पाण्याचा कायमचा प्रश्‍न मिटेल.

कोथळे या गावाच्या हद्दीत पाणी येणार आहे. तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर हे कोथळे गावाच्या मुंगीघाटापासून अंदाजे 300 मीटर ते 500 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे कमी खर्चात मुंगीघाटापासून पुष्कर तलावात सुमारे अंदाजे 300 मीटर पाणी उचलून पाईपलाईनद्वारे येऊ शकेल. त्याच बरोबर पुष्कर तलावात पाणी आले तर यांचा इतर गावाचा पाणी प्रश्‍न सुटेल.

मंदिर परिसरातील समस्या
* गावामध्ये कोठेही कचराकुंडी नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे.
* गावातील सर्व भागातील अंर्तगत रस्त्याची दयनीय अवस्था आहे.
* सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्याने अनेक रस्त्यावरून सांडपाणी वाहत असते.
* शौचालयाची सोय ग्रामस्थ व येणार्‍या भाविकासाठी कोठेही नाही.
* शिंगणापूरमध्ये येणार्‍या भाविकांच्या वाहनासाठी कोठेही वाहनतळ व्यवस्था पार्किग झोन नाही.
* गावामध्ये कुठे ही सार्वजनिक मुतारी नाही.
* आरोग्य उपकेंद्रात 24 तास सेवा उपलब्ध नाही.
* भाविकासाठी भक्तीनिवासाची सोय नाही.
* संपूर्ण गावासह वाडीवस्तीवर लाईटच्या समस्या आहेत. 
* शंभू महादेव मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावरील संरक्षण कठड्याची दुरावस्था