Breaking News

राजकीय पक्षांच्या मतदान केंद्र सहायकांच्या बैठका


सातारा (प्रतिनिधी) : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्या यादी भागाचे विविध राजकीय पक्षांचे केंद्र सहायक यांची बैठक दि. 17, 18 व 19 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून त्यात मतदार यादीसंदर्भात चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीला सर्व नोंदणीकृत पक्षांनी आपले मतदार केंद्र सहायकाना या महत्वाच्या बैठकीला पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे. संबंधित यादी भागामध्ये मतदार यादीत पात्र वंचित मतदार यांची नोंदणी करणे, दुबार, अनेकविध नोंदणी असलेले मतदारांची वगळणी करणे, मृत मतदारांची नावेे वगळणे, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांच्या नोंदी तपासून त्यांची नावे वगळणे, दिव्यांग मतदारांच्या नोंदी करणे, मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचा तपशील पडताळणे, नोंद योग्य प्रकारे झाली आहे किंवा कसे आणि मतदार यादीतील त्रुटी तपासणे याबाबत एकत्रित बैठकीत हे विषय होतील. जिल्ह्यातील मतदारांना इव्हिएम व्हिव्हिपॅटची ओळख व्हावी व ते हाताळता यावे, यासाठी हा कार्यक्रम पुढील आठवड्यापासून जिल्ह्यातील आठही मतदारसंघांमध्ये सुरू होत आहे. 

यावेळी मतदारांसमोरही प्रात्यक्षिके करण्यात येणार आहे. या प्रात्यक्षिकांवेळी मोठया प्रमाणावर मतदारांनी उपस्थित रहावे यासाठी सर्वच नोंदणीकृत पक्षांनी प्रयत्न करावेत. तसेच आपले मतदान केंद्र सहायकांची नियुक्ती करुन त्यांची यादी निवडणूक विभागाला सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.