Breaking News

हंगामी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला


नवीदिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आपला हंगामी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होऊन 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल.

संसदीय प्रकरणांच्या कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्प असेल. कोणत्याही सरकारच्या कार्यकाळातील अखेरीस हंगामी अर्थसंकल्प सादर केला जातो. संपूर्ण अर्थसंकल्प निवडणुकीनंतर सत्तेवर येणारे सरकार सादर करते. अर्थमंत्री अरुण जेटली हे हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. 2019 च्या निवडणुकीपूर्वीच्या हंगामी अर्थसंकल्पात शेतकरी, मध्यमवर्गीय आणि उत्पादनशुल्कावर काहीतरी तरतूद होण्याची शक्यता आहे. सरकारने जीएसटीअंतर्गत यापूर्वीच व्यापार्‍यांना दिलासा दिला आहे. या हंगामी अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीय वर्गासाठी मोठी घोषणा केली जाऊ शकते. प्राप्तिकराची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गृहकर्जावरही सूट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पगारी नोकरदारांच्या कर, बचत मर्यादेत वाढ केली जाऊ शकते. हंगामी अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीपूर्वीच्या या अर्थसंकल्पात सरकार जनतेला आकर्षित करण्यासाठी लोकानुनयी निर्णय घेण्याची शक्यता आहे.