Breaking News

घारेवाडी येथे 11 जानेवारीपासून बलशाली युवा हृदय संम्मेलन
कराड,  (प्रतिनिधी) ः घारेवाडी येथील 18 व्या बलशाली युवा ह्रदय संमेलनाला 11 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. तीन दिवसाच्या संमेलनात विविध वक्त्यांचे मार्गदर्शन होणार असून संमेलनात 4 हजारहून अधिक युवक-युवती सहभागी होतील, असा विश्‍वास संयोजकानी व्यक्त केला आहे.
घारेवाडी (ता. कराड) येथील शिवम् आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षी बलशाली युवा ह्रदय संमेलनाचे आयोजन केले आहे. यंदाचे 18 वे वर्ष आहे. पुणे येथील मेटल इंडस्ट्रीअल कंपनीचे एमडी प्रकाश धोका यांच्या हस्ते उदघाटनाने संमेलन प्रारंभ होईल. ’जॉय ऑफ गिविंग’ या विषयावर त्याचे व्याख्यान होईल. त्यानंतर विवेक वेलणकर यांचे ’माहिती अधिकार कायदा’ या विषयावर व्याख्यान होईल. तिसर्‍या सत्रात ’मरावे परि अवयव रूपी ऊरावे’ या विषयावर कोमल न्यु लाईफ फाऊंडेशनच्या संस्थापिका कोमल पवार-गोडसे या मार्गदर्शन करतील. नंतर अधिकराव कदम यांच्या ’हिमालयावर येता घाला’ या व्याख्यानाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. दुसर्‍या दिवशी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस होल्डर विराग वानखेडे यांच्या ’असा मी असामी’ या विषयावर बोलतील. तसेच शेती उद्योजक अशोक इंगवले यांचे ’सेंद्रीय शेती’ विषयावर व्याख्यान होईल. दुसर्‍या सत्रात विवेक सावंत यांचे ’कृत्रिम बुध्दीमत्ता व उद्याचे शिक्षण’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर दीपस्तभचे संस्थापक युजवेंद्र महाजन यांच्या ’चांगला माणूस घडविण्यासाठी’ या विषयानंतर रामदास माने यांचे ’असा घडतो उद्योजक’ या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी देशभक्तीपर जागो हिंदूस्थानी कार्यक्रमाने त्या दिवसाचा सांगता होईल. रविवारी अभिरामजी प्रभूच्या ईस्कॉन नाम संकिर्तनाने सुरूवात होईल. त्यानंतर नाम फाऊंडेशचे संस्थापक सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांचे ’शेतकर्‍यांच्या व्यथा’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर माजी अतिरिक्तकार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख याच्या मार्गदर्शनाने संमेलनाचा सांगता समारोप होईल.