Breaking News

मलकापूर पालिकेसाठी भाजपाच्या मुलाखतींस 119 इच्छुक

बुलढाणा, ब्रेकिंग,  

मलकापूर,  (प्रतिनिधी) : मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीचे रणांगण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पार्टीने आज मलकापूर नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असता नगराध्यक्षपदासह 20 जागांसाठी होणार्या या निवडणुकीच्या मुलाखतीसाठी 119 जणांनी उपस्थिती लावली.

भाजपाच्यावतीने आज मलकापूरातील खंडोबानगर येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे प्रदेश चिटणीस नामदार डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, शेतीमित्र अशोकराव थोरात, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, मोहनराव जाधव, आर. के. भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या.

मलकापूर नगरपालिकेसाठी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असून, नगराध्यक्षपदासाठी 12 इच्छुक महिलांनी मुलाखती दिल्या. यामध्ये मानसी शशिकांत राजे, डॉ. सारिका प्रशांत गावडे, दिपाली आबासाहेब गावडे, सुवर्णा रवींद्र येडगे, माजी जि.प. सदस्य भारती अनिल कडव, दिपा राहूल भोसले, अश्‍विनी संतोष हिंगसे, विद्याराणी हणमंतराव कराळे, रजनी सुभाष माने, गौरी सुनील कोळी, प्रियांका भारत जंत्रे, रूक्मिणी बाळासो जंत्रे यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना नामदार डॉ. अतुल भोसले यांनी भाजपाच्या मुलाखतींना इच्छुकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता मलकापूरमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले. मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून, भाजपच्या नेतृत्वामुळे भविष्यात या शहराला निधीची कमतरता भासणार नसल्याचे प्रतिपादन मदनराव मोहिते यांनी केले. अशोकराव थोरात यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. हर्षवर्धन मोहिते यांनी आभार मानले.

दरम्यान, भाजपातर्फे आयोजित मुलाखतीसाठी एकूण 119 जणांनी उपस्थिती लावली. यामध्ये पुरूषांची संख्या 59; तर 60 महिला उपस्थित होत्या. त्यामुळे महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत होती. शिवाय डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट, एम.ए.बी.एड. तसेच विज्ञान, नर्सिंग शाखेचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांनी भाजपाकडून निवडणूक लढविण्यास उत्सुकता दाखवली.