Breaking News

जावलीत कडाक्याच्या थंडीने घेतला 11 जणांचा बळी


कुडाळ, (प्रतिनिधी) : चालू वर्षी कडाक्याच्या थंडीने उच्चांक मांडला आहे देशभरात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत थंडीने कहर माजवला आहे यात सातारा जिल्हा ही कुठेही थंडीत मागे नाही. पश्‍चिम महाराष्ट्राच्या महाबळेश्‍वरपाठोपाठ जावळी, बामणोली परिसरात थंडीने उच्चांक केला असल्याची नोंद झाली आहे. या थंडीने जावळी तालुक्यातील बामणोली परिसरासह 11 जणांचे बळी आत्तापर्यंत घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 70 वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदाच इतकी कडाक्याची थंडी जावळी, महाबळेश्‍वर परिसरात दिसून आली. या थंडीत गारठून अनेक जण आरोग्य आणि कमकुवत झाले तर काहींचे थंडीने बळी गेल्याचे निमित्त झाले. जावळी तालुक्याच्या दक्षिण विभागात बामणोली परिसरात थंडीचा कडाका कायम असून एका आठवडयात या विभागात तब्बल दहा वृध्दाचा तर’ मेढा विभागात एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून , थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रासह जावळी . तालुक्यामध्ये कडाक्याच्या थंडीने उच्चांक गाठला असून गेल्या काही दिवसांपासून बामणोली ,तापोळा ,कास परिसरातही थंडीने उच्चांक गाठला आहे .दिवसभर कडाक्याचे ऊन असले तरी थंडीने हुडहुडी भरत आहे.त्यामुळे जीवन विस्कळीत झाले असून कास तापोळा परिसरातील गावांमध्ये एकापाठोपाठ एक अशा वयोवृद्ध व्यक्तींचे मृत्यू होऊ लागले आहेत. या सर्व ज्येष्ठ नागरीकांचे मृत्यू रात्रीच्या वेळी झाले आहेत त्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. बामणोली व परिसरात मागील आठ दहा दिवसापासुन कडाक्याची थंडी पडू लागली आहे. या थंडीची तीव्रता दिवसागणीक वाढतच आहे. मागील काही दशकांचा विक्रम या थंडीने मोडीत काढला असल्याचे ग्रामीणभागातील नागरिकांनी सांगीतले. या थंडीचा परिणाम माणसांबरोबरच पशुपक्षांना ही जाणवू लागला आहे. जंगली प्राणी तसेच पाळीव प्राणी गाई, म्हैस, शेळी, कुत्री , मांजरे, या मुक्या प्राण्यांनाही या थंडीने बेजार केले आहे. दिवसभर उन्हाची तीव्रता थंडीमुळे जाणवतही नाही. सर्व लोक शेकोटी तसेच स्वेटर व ऊबदार कपडयांचा आधार घेवू लागले आहेत. या परिसरातील तरूण वर्ग मुंबई व शहरी भागात नोकरी मिमित्ताने स्थायीक आहेत. गावाला वयस्कर लोक घरदार व शेती सांभाळत आहेत. आत्तापर्यंत कधीच एवढया मोठया प्रमाणात थंडी पडली नसल्याचे अनेक गावचे जाणकार व वयस्क लोक या विषयी आपली मते व्यक्त करत आहेत. सर्व मृत व्यक्ती ह्या थंडी सहन न झाल्यामुळे रात्रीच्या वेळीच निधन पावल्या आहेत. डॉक्टरांनीही थंडीमुळे मृत्यू हो0याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


शीतबळी ठरलेले ज्येष्ठ नागरीक

गणपत अहिरे (वय 80, आटाळी), बनाबाई शिंदे (वय 82, रा. सावरी), वामन डिगे (वय 76, रा. पावशेवाडी), दामोदर सिंदकर (वय 65, रा . बामणोली), हौसाबाई साळुंखे (वय 99, रा. शेंबडी), कृष्णाबाई कदम (वय 90, रा. खरोशी), सुनिता पवार (वय 59, रा. पावशेवाडी), दिनकर जांभळे (वय 61, रा . कास), श्रीरंग शेडगे (2वय 60, रा. अंबाणी) , सावित्राबाई गोरे (वय 78, रा. म्हावशी) शामराव लक्ष्मण गोळे ( वय 65, रा. विवर) अशा एकूण 11 जणांचा मृत्यू या कडाक्याच्या थंडीने झाला आहे.