Breaking News

एफआरपीप्रश्‍नी 14 कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस


सातारा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु होऊन दोन महीने झाले तरी शेतकर्‍यांना एफ़आरपीप्रमाणे ऊसाची बिले अदा केली नाहीत म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवड़े यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड़ यांना सदर साखर कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रद्वारे केली होती. तरीही साखर आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या पदधिकार्‍यांनी पुणे येथे साखर आयुक्तांची भेट घेवून बिले न देणार्‍या साखरसम्राटावर त्वरित कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले आणि त्वरित कारवाई झाली नाहीतर स्वाभिमानीचे खा राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता.


यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड़ व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवड़े यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या स्वाभिमानीच्या पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत शेखर गायकवाड यांनी सर्व सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना परिपत्रक काढून ऊस नियत्रंण आदेश 1966 चे कलम 3 (3 ) मधील तरतूदीनुसार चालू हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसापोटी 14 दिवसात एफ़आरपी प्रमाणे होणारी किंमत आदा करावी तसेच विहीत मुदतीत एफ़आरपीप्रमाणे ऊस देयक न दिल्यास कलम 3 (3/अ) नुसार विलंब कालावधीकरता 15 टक्के व्याज आकारण्याची तरतुद असून त्याप्रमाणे सर्व साखर कारखान्यांना आदेश दिल्याचे सांगितले. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी मिळून 14 साखर कारखाने असून त्यामध्ये अजिंक्यतारा सातारा, बाळसाहेब देसाई पाटण, कराड तालुक्यातील सह्याद्रि, कृष्णा, जयवंत शुगर, रयत अथनी, वाई तालुक्यातील किसन वीर भुईज, प्रतापगड़ किसनवीर, फलटण तालुक्यातील श्रीराम जवाहर, स्वराज इंडिया, शरयू शुगर्स, जरांडेश्‍वर कोरेगांव व ग्रीन पॉवर गोपूज ता. खटाव आदी कारखान्यांचा समावेश आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवड़े, पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष शंकर शिंदे, अलीभाई इनामदार, धनंजय महामुलकर, सातारा तालुकाध्यक्ष संजय साबळे, कराड उत्तरचे अध्यक्ष शिवाजी पाटील, बी जी साबळे, रहिमतपूर शाखेचे अध्यक्ष विक्रम निकम, विनायक पाटील, राहुल शिंदे, विद्यार्थी आघाडी पुणे सौरभ वळवाड़े, शुभम सोनमल आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.