Breaking News

शून्याहून कमी तापमानात; जवानांनी वाचवले 150 जणांचे प्राण


गंगटोक (सिक्कीम)- हुडहुडी भरायला लावणारे शून्य अंशाहूनही कमी तापमान, जीवघेणी बर्फवृष्टी, दूरदूरपर्यंत राहायला सुरक्षित जागा नाही... अशा परिस्थितीत लाचूंग घाटात अडकलेल्या 150 पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची कामगिरी भारतीय सैन्याच्या जवानांनी केली आहे. जीव धोक्यात घालून जवानांनी केलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लाचूंग घाटात सुमारे 150 पर्यटक अडकल्याची माहिती बुधवारी सिक्कीममधील त्रिशक्ती कॉर्प्सच्या मुख्यालयाला मिळाली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्रिशक्ती कॉर्प्सचे जवान कामाला लागले. लाचूंग घाटात प्रचंड बर्फवृष्टी होत होती. अशा परिस्थितीत जीवाची पर्वा न करता जवानांनी पर्यटकांना घाटातून बाहेर काढले. त्यांना ठेवण्यासाठी कोणतेही सुरक्षित स्थळ नसल्याने जवानांनी स्वत:च्या बराकी रिकाम्या केल्या. पर्यटकांकडे खाण्या-पिण्यासाठी काहीच नव्हते, हे लक्षात येताच सैनिकांनी स्वत: अर्धपोटी राहून त्यांना जेवण दिले. बचावकार्य करताना एका महिलेचा हात फ्रॅक्चर झाल्याचे कळल्यावर तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. अनेक लोकांना चक्कर येत होती. काही जणांना श्‍वास घ्यायला त्रास होत होता, तर अनेकांना थंडीताप भरला होता. सैनिकांनी या सगळ्यांना आवश्यक ती औषधे देऊन त्यांची व्यवस्थित सोय केली. जवानांची ही तत्परता पाहून पर्यटक अत्यंत भावूक झाले. सगळ्यांनीच जवानांच्या धाडसाचे व त्यागाचे कौतुक केले.  काही दिवसांपूर्वी गंगटोक आणि नथुला मार्गावर अडकलेल्या सुमारे 3 हजार पर्यटकांचीही लष्कराच्या जवानांनी अशीच सुटका केली होती.