Breaking News

राज्याच्या आरोग्य विभागात लवकरच 15 हजार जागांची भरती : एकनाथ शिंदे


मुंबई : राज्यातली आरोग्यसेवा सुधारण्यासाठी लवकरच 15 हजार 9 पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती नव्याने पदभार स्वीकारलेले आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदेंनी गुरुवारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच विभागाची आढावा बैठक मंत्रालयात घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी, केंद्र शासनाच्या योजना याबाबत सविस्तर माहितीही शिंदेंनी जाणून घेतली.

आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत आरोग्यमंत्री म्हणाले की, सामान्य नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचा प्रयत्न आहे. विविध संवर्गातील 15 हजार पदे रिक्त आहेत. ती विहित कालमर्यादेत भरण्यात येतील. ग्रामीण भागात सेवा देणार्‍या डॉक्टरांना चांगल्या सेवा सुविधा दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच दुर्गम भागात काम करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना विशेष लाभ यासह इतर राज्यातल्या पद्धतीचा अभ्यास करून वेतन देण्याचा प्रयत्न करणार आहे. टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र ठाणे येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतल्यानंतर आरोग्यमंत्री म्हणाले की, या क्षेत्रात राज्याचे काम चांगले आहे. आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी विभागाने प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी आरोग्यमंत्री शिंदे यांनी केले.