Breaking News

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबास नाम फाऊंडेनकडून 15 हजाराची मदत


पुसेगाव,  (प्रतिनिधी) : सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे पुरस्कृत नाम फाउंडेशनच्या वतीने त्रिमली (ता.खटाव) येथील दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेले शेतकरी शिवाजी येवले यांच्या कुटुंबियांना 15 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. धनादेश स्वीकारताना शिवाजी येवले यांच्या मातोश्री शांता येवले, पत्नी मीना येवले, सरपंच जयश्री येवले, बाळासाहेब शिंदे, जितेंद्र शिंदे, पत्रकार राजेंद्र शिंदे , मधुकर येवले व ग्रामस्थ उपस्थित होते. मयत शिवाजी येवले (वय 35) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ऐन दुष्काळाचे सावट सुरु असताना नामच्या वतीने येवले कुटुंबियांना मिळालेल्या या मदतीबद्द्ल पत्नी मीना शिवाजी येवले यांनी भावोद्गार काढून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. धनादेश सुपूर्त करतेवेळी पश्‍चिम महाराष्ट्र नाम फाउंडेशनचे विभागीय समनव्यक गणेश थोरात पत्राद्वारे व्यक्त केलेल्या भावनांचे वाचन करण्यात आले, हा धनादेश येवले कुटुंबाकडे  अशा कारणासाठी सुपूर्त करताना खरे तर नाम फाउंडेशनच्या संपूर्ण टीमला अतीव दुःख होत आहे.समाजाने अशा दुर्दैवी घटनेतून बोध घेऊन आपल्या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. जेणेकरून दुष्काळामुळे अडचणीत आलेली शेती व शेतकरी दोघांनाही बाहेर काढता येऊ शकते फक्त गरज आहे ती सामूहिक इच्छाशक्तीची. गावात पाण्याची सोय झाली तर शेती फुलेल व शेतकरी आत्महत्या करणार नाही  व ते गाव देखील आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनेल.